खरीप कांद्याच्या उत्पादनात देशात नऊ लाख टन घट शक्य 

onion price 3.jpg
onion price 3.jpg

नाशिक : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने यंदा देशामध्ये खरीप कांद्याच्या उत्पादनात नऊ लाख टनांनी घट येण्याचा अंदाज वर्तविला आहे, तसेच बटाट्याचे पावणेदोन लाख, तर टोमॅटोचे २९ हजार टनांनी उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्याच वेळी यंदाच्या पावसाने कांद्याच्या रोपांचे नुकसान केले असून, खरीप कांद्याची आवक महिन्याने उशिरा होईल. आज कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव तीन हजार ते तीन हजार ६०० रुपये असा राहिला. 

बटाट्याची पावणेदोन लाख अन्‌ टोमॅटोची २९ हजार टन घट शक्य
महाराष्ट्राप्रमाणे, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, हरियाना, पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. जुलै ते ऑगस्टमध्ये लागवड होणाऱ्या खरीप कांद्याची काढणी ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये होते. यंदा पावसामुळे नवीन कांदा बाजारात येण्यास नोव्हेंबर उजाडण्याची चिन्हे दिसताहेत. गेल्या वर्षी ४८ लाख ४१ हजार टन खरीप कांद्याचे उत्पादन देशात मिळाले होते. यंदा हेच उत्पादन ३९ लाख टन येण्याची शक्यता केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये क्विंटलभर कांद्याला मिळालेला भाव रुपयांमध्ये असा : येवला- तीन हजार, लासलगाव- तीन हजार २००, कळवण- तीन हजार ४००, चांदवड- तीन हजार, मनमाड- तीन हजार, पिंपळगाव बसवंत- तीन हजार ५५१, देवळा- तीन हजार ४५०, उमराणे- तीन हजार ६००. 


टोमॅटोला मुंबईत तीन हजार ८०० रुपये भाव 
टोमॅटो जुलै ते नोव्हेंबरमध्ये खरिपाचा टोमॅटो विक्रीसाठी बाजारात येतो. प्रामुख्याने मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाना, तेलंगणामध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी देशामध्ये खरीप टोमॅटोचे ५९ लाख १६ हजार टन उत्पादन मिळाले होते. यंदा ते ५८ लाख ८७ हजार टन अपेक्षित आहे. मागणी आणि उपलब्धतेचे प्रमाण व्यस्त असल्याने शुक्रवारी मुंबईमध्ये क्विंटलभर टोमॅटोला तीन हजार ८०० रुपये असा भाव मिळाला. यापूर्वी मुंबईत तीन हजार ३०० रुपये क्विंटल भावाने टोमॅटोची विक्री झाली होती. त्याच वेळी टोमॅटोची बाजारपेठ असलेल्या पिंपळगावमध्ये दोन हजार १०५ रुपये असा भाव मिळाला आहे. 

नाशिकमध्ये बटाट्याचा भाव दोन हजार ३०० 
महाराष्ट्र, उत्तराखंड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तमिळनाडूमध्ये बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. या महिन्यापासून नवीन बटाटा विक्रीसाठी येण्यास सुरवात झाली असून, नोव्हेंबरपर्यंत नवीन बटाटा विकला जाईल. गेल्या वर्षी देशात १० लाख १६ हजार टन बटाट्याचे उत्पादन झाले होते. यंदा आठ लाख ४५ हजार टनांचे उत्पादन अपेक्षित आहे. शुक्रवारी नाशिकमध्ये दोन हजार ३०० रुपये क्विंटल या भावाने बटाट्याची विक्री झाली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com