'निफाड तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करा' - आमदार दिलीप बनकर

दीपक अहिरे
Tuesday, 6 October 2020

निफाड तालुक्यातील विस्कळीत विज पुरवठ्याबाबत आमदार बनकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सध्या शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देतांना अनियमीत वीज पुरवठ्यामुळे अडथळा येत आहे

नाशिक : (पिंपळगांव बसवंत) नादुरूस्त रोहीत्रामुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना खंडीत वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. नादुरूस्त रोहीत्र तात्काळ दुरूस्तीसाठी वीज वितरण विभागाने जलद गतीने समस्या दुरू कराव्या. अतिरिक्त दाब येणार्या रोहीत्राची क्षमता वाढवा. वीज पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये, अशा सुचना आमदार दिलीप बनकर यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकार्ऱ्यांना दिल्या. 

निफाड तालुक्यातील विस्कळीत विज पुरवठ्याबाबत आमदार बनकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यादरम्यान बनकर म्हणाले, की सध्या शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देतांना अनियमीत वीज पुरवठ्यामुळे अडथळा येत आहे. शहरी भागातही वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे तालुक्यातून शेतकरी व नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी वीज वितरण कंपनीने आवश्‍यक ती पावले उचलावी. अतिदाबा असलेल्या रोहीत्राची क्षमता वाढवा किंवा त्या ठिकाणी दोन रोहीत्र बसवा अशा सूचना करत रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचेही सांगितले. यावेळी पिंपळगांव येथे झालेल्या बैठकीस कार्यकारी अभियंता काळे, डोंगऱे उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे,  पाटील, करोसे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide regular power supply in Niphad taluka mla bankar nashik marathi news