लासलगावच्या नऊ निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांवर छापे; कांद्यांचे लिलाव बंद, व्यापाऱ्यांत धास्ती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

लासलगाव बाजार समितीतील कांद्यांचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. आयकर विभागाने लासलगाव परिसरातील 9 कांदा व्यापाऱ्यांवर काल छापे मारल्यामुळे आज (ता.१५) एकही व्यापारी लिलावात भाग घेण्यासाठी आले नाही. निर्यात बंदी केल्यानंतर देखील कांद्यांचे भाव वाढत असल्याने आयकर विभागाने छापे मारले आहेत.

नाशिक/ मालेगाव : लासलगाव बाजार समितीतील कांद्यांचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. आयकर विभागाने लासलगाव परिसरातील 9 कांदा व्यापाऱ्यांवर काल छापे मारल्यामुळे आज (ता.१५) एकही व्यापारी लिलावात भाग घेण्यासाठी आले नाही. निर्यात बंदी केल्यानंतर देखील कांद्यांचे भाव वाढत असल्याने आयकर विभागाने छापे मारले आहेत.

लासलगावच्या नऊ निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांवर छापे

सध्या किरकोळ बाजारामध्येही कांद्याने प्रतिकिलो ५० रुपये दर ओलांडले आहेत. त्यामुळे साठेबाजी वाढू नये यासाठी व्यापाऱ्यांवर दबावतंत्राचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने लासलगाव येथील नऊ निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांवर बुधवारी छापे टाकले. लासलगाव येथील मुख्य बाजार आवारावर कांद्याच्या दराने तीन हजारांचा टप्पा ओलांडत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केली होती. दुसऱ्या टप्प्यात कांदा दराने साडेचार हजार रुपयांचा दर ओलांडल्याने केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने हे छापे टाकले. या अचानक छापासत्रामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.

व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण ​

लासलगाव येथील नऊ कांदा व्यापाऱ्यांचे घर, कार्यालय व गोदामे या ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याची माहिती व्यापारी वर्गाकडून पुढे आली. कांद्याचे वाढते दर लक्षात घेता, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध लादले आहे. मात्र, तरीही कांदा दर आटोक्यात येत नसल्याने आता कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून कांद्याची साठवणूक, निर्यात या बाबतीत दबाव निर्माण करण्याचा हा सरकारचा भाग असला तरी या कारवाईने व्यापारी वर्गाने धास्ती घेतली आहे. असे होणार असेल तर कांद्याचा व्यापार करावा की नाही, असा प्रश्न आम्हाला पडल्याचे कांदा व्यापारी सांगत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raids on nine onion traders in Lasalgaon nashik marathi news