''पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती सुरू करा''; स्टुडंट असोसिएशनतर्फे औरंगाबाद-मुंबई पायी मोर्चा 

प्रमोद दंडगव्हाळ 
Monday, 14 September 2020

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू करावी, यासाठी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनतर्फे औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडीस सुरवात झाली आहे. रविवारी  नाशिक येथील पाथर्डी फाटा येथे दिंडीचे आगमन झाले.

नाशिक :  पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू करावी, यासाठी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनतर्फे औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडीस सुरवात झाली आहे. रविवारी  नाशिक येथील पाथर्डी फाटा येथे दिंडीचे आगमन झाले.

शिक्षक भरती तीन वर्षांपासून रखडली

कोविड-१९ या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम म्हणून वित्तीय उपाययोजना करण्यावरून पदभरतीवर ५ मेस बंदी घालण्यात आली. त्याच अनुषंगाने शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या (खासगी, अल्पसंख्यांक, स्थानिक संस्था जसे- जिल्हा परिषद, महापालिका, पालिका) सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, 
माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक या सर्व पदांवर निर्बंध लादले. मात्र पवित्र पोर्टलमार्फत करण्यात आलेली शिक्षक भरती तीन वर्षांपासून रखडली असून, १२ हजार १४७ पैकी पाच हजार ८०० जागा भरल्या आहेत.

विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षक उपलब्ध करून द्यावे

विशेष परवानगीसाठी शालेय शिक्षण विभागाने अर्थ मंत्रालयाकडे विशेष परवानगी मागितली आहे. परंतु सध्या यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. ही भरतीप्रक्रिया तीन वर्षांपासून सुरू असून, त्यामुळे भरतीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. उमेदवारांत याबाबत प्रचंड असंतोष आहे. या भरतीला सूट देऊन आमच्यावरील अन्याय तत्काळ दूर करावा व ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, यासाठी ५ सप्टेंबर २०२० पासून औरंगाबाद ते मुंबई मंत्रालयावर अन्नत्याग पायी दिंडीची सुरवात केली आहे. तरी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष संदीप कांबळे, जीवन काकडे, तुषार देशमुख यांनी केली आहे.

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For recruitment through Portal nashik marathi news