अंत्‍यसंस्कारानंतर नातेवाइकांचे पीपीई किट जातात कुठे?पुन्हा वापरले जाण्याचा संशय; वाचा सविस्तर

विक्रांत मते
Friday, 18 September 2020

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जात नाही. महापालिकेच्या यंत्रणेमार्फतच अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार वीजदाहिनी किंवा गॅसदाहिनीतच करावेत, अशा शासनाच्या सूचना आहेत.

नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जात नाही. महापालिकेच्या यंत्रणेमार्फतच अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार वीजदाहिनी किंवा गॅसदाहिनीतच करावेत, अशा शासनाच्या सूचना आहेत. अंत्यसंस्कारावेळी मृतांच्या ठराविक नातेवाइकांना पीपीई किट घालूनच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते पीपीई किट परत घेतले जातात. पुढे त्या किटचे काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या किट पुन्हा वापरात आणल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अंत्‍यसंस्कारानंतर नातेवाइकांचे पीपीई किट जातात कुठे?

महापालिकेकडे एक वीज व एक गॅसदाहिनी आहे. गॅसदाहिनी ऑगस्टअखेर बंद पडली होती. त्यामुळे वीजदाहिनीवर संपूर्ण भार आला होता. वीजदाहिनीत २४ तासांत १३ ते १४ अंत्यसंस्कार होतात. दीड ते दोन तासांनी एक अंत्यसंस्कार होतात. गॅसदाहिनीमध्ये २४ तासांत आठ ते दहा अंत्यसंस्कार होतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन ते चार दिवस मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत नव्हते. त्यामुळे तब्बल ७६ मृतदेह प्रतीक्षेत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी गॅसदाहिनी तातडीने दुरुस्त करताना सोशल डिस्टन्स ठेवून लाकडावरही अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली. त्यानुसार प्रतीक्षायादी कमी होऊन मृतांवर अंत्यसंस्कार होत आहेत.

पुन्हा वापरले जाण्याचा संशय

महापालिकेतर्फे मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असले, तरी चार ते पाच नातेवाइकांना ठराविक अंतर ठेवून उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्या वेळी पीपीई किट परिधान करणे बंधनकारक आहे. त्याचा खर्च संबंधितांनाच करावा लागतो. अंत्यसंस्कारानंतर पीपीई किट जागेवर काढून ठेवण्याची सक्ती केली जाते. नातेवाइकांनी पीपीई किट काढून दिल्यानंतर नियमानुसार त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असताना ते किट अमरधाममधील कर्मचारी, रुग्णवाहिकेवरील कर्मचारी काढून ताब्यात घेण्याची सक्ती करतात. पुढे त्या पीपीई किटचे काय होते, याबाबत मात्र कोणालाच माहिती नसल्याने त्या किट पुन्हा वापरात आणल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करताना होणारी वशिलेबाजी समोर आली होती.

 

मुळात पीपीई किट फक्त डॉक्टरानांच वापरण्याची परवानगी आहे. त्यातही शासनाची मार्गदर्शक तत्त्वे असून, ते कसे परिधान करावे, कसे काढावे, यासंदर्भातही नियम आहेत. नातेवाइकांना अजिबात प्रवेश दिला जात नाही. लांबूनच मृतदेहाचे दर्शन दिले जाते. त्यामुळे पीपीई किटसंदर्भात होत असलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.
-डॉ. कल्पना कुटे, आरोग्याधिकारी, महापालिका, नाशिक्‍

 

 

संपादन : रमेश चौधरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: relatives PPE kits go after the funeral nashik marathi news