दिंडोरीत तालुक्यात सरपंच निवडीला गालबोट; महिला उमेदवारावर जीवघेणा हल्ला, पाच पोलिस कर्मचारी जखमी 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 16 February 2021

दिंडोरी तालुक्यातील महाजे येथे सरपंच, उपसरपंच निवडणुकीला गालबोट लागले. सरपंचपदाच्या महिला उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.

दिंडोरी/लखमापूर/वणी (जि.नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील महाजे येथे सरपंच, उपसरपंच निवडणुकीला गालबोट लागले. सरपंचपदाच्या महिला उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सोमवारी (ता. १५) घडली.

महाजे येथे महिला उमेदवारावर हल्ला; पाच पोलिस कर्मचारी जखमी 

दिंडोरी तालुक्यातील महाजे गटग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी भोये यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाजे येथील गटग्रामपंचायतींतर्गत सादराळे व शृंगारपाडा येथील सदस्यांचे बहुमत असल्याने येथील सदस्यांची सरपंच, उपसरपंचपदी निवड होण्याची शक्यता होती. त्यास महाजे येथील सदस्य व काही ग्रामस्थांचा विरोध होता. येथे वाद होण्याची कुणकुण पोलिस प्रशासनाला लागल्याने येथे वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सादराळे व शृंगारपाडा येथील सदस्य निवडणूक प्रक्रियेस आले असता, त्यांना अडवत प्रक्रियेसाठी जाण्यापासून रोखण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. त्यांनी संबंधित सदस्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता या वेळी काही ग्रामस्थांनी दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाऊ दिले. या वेळी झालेल्या गोंधळात काही महिलांनी सरपंचपदाच्या उमेदवार रूपाली भोये यांना रोखत त्यांच्यावर हल्ला केला. साडीने गळा आवळण्याबरोबरच एका वृद्ध महिलेलाही मारहाण झाल्याचा प्रकार घडल्याचे समजते. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

वृद्ध महिलेलाही मारहाण
सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार पजई, युवराज खांडवी आदींनी या महिलेची सुखरूप सुटका केली. या झटापटीत सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, युवराज खांडवी, पजई यांच्यासह पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त बोलवत निवडणूक प्रक्रिया विहित वेळेत पार पाडली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश

कडक पोलिस बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया

पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत महिला उमेदवाराचा जीव वाचविल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, विरोधी गटाच्या दगडफेकीत सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह पाच पोलिस कर्मचारी व काही ग्रामस्थ जखमी झाले आहेत. दरम्यान, कडक पोलिस बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया पार पडत सरपंचपदी रूपाली भोये, तर उपसरपंचपदी कविता इंगळे यांची निवड करण्यात आली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: riot in Sarpanch election at Dindori taluka nashik marathi news