esakal | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या
sakal

बोलून बातमी शोधा

rober mumbai.jpg

मुंबई-आग्रा रोडवरील १० मैल परिसरातील हॉटेलवर जेऊन घरी जात असताना त्यांच्या इनोव्हा थांबवून नाशिकपर्यंत सोडण्याच्या बहाण्याने चौघांनी लिफ्ट मागितली. गाडीत त्यांच्या डोक्यास पिस्तूल आणि चॉपर लावून त्यांचे हात व डोळे बांधले

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

sakal_logo
By
यूनुस शेख

नाशिक : लिफ्ट नावाखाली व्यापाऱ्यास शस्त्राचा धाक दाखवून लूट करणाऱ्या टोळीतील एक गुन्हेगारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुंबई वसई येथून अटक करीत त्याच्याकडून गावठी पिस्तूलसह इनोव्हा कार जप्त केली. चौघे संशयित फरारी असून, त्यांच्या शोधात पथक तयार केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. 

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार 
शहरातील व्यापारी उमेश चंद्रकांत गाडे सोमवारी (ता. १६) मध्यरात्री अडीचच्या सुमारास मुंबई-आग्रा रोडवरील १० मैल परिसरातील हॉटेलवर जेऊन घरी जात असताना त्यांच्या इनोव्हा (एमएच १५, बीडी ८३२१) थांबवून नाशिकपर्यंत सोडण्याच्या बहाण्याने चौघांनी लिफ्ट मागितली. गाडीत त्यांच्या डोक्यास पिस्तूल आणि चॉपर लावून त्यांचे हात व डोळे बांधले. खिशातील रोख रक्कम, चांदीचे कडे, चांदीची अंगठी घड्याळ, तसेच इनोव्हा कार असा सुमारे पाच लाख पाच हजार ४०० रुपयांचा ऐवज घेऊन संशयित पळाले. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या गुन्हे पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

लूट प्रकरणी मुंबईतील संशयित गजाआड

ग्रामीण पोलिसांच्या उपनिरीक्षक मुकेश गुजर, सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, हवालदार दीपक आहिरे, संदीप हांडगे, अमोल घुगे, हेमंत गिलबिले, सचिन पिंगळ, प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने मुंबई आग्रामार्गावरून प्राप्त झालेल्या सीसीटिव्ही फुटेज आणि खबऱ्याच्या माहितीनुसार मुंबई येथील अंधेरी, वसई-विरार परिसरात सलग दोन दिवस तळ ठोकून वसई येथील एक्हर शाइन इमारतीखाली उभी असलेल्या इनोव्हासह जुहू पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सराईत गुन्हेगार अमन हिरालाल वर्मा (वय ३५, समतानगर, गुलमोहर क्रॉस रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून कारमधून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, चॉपर, धारदार कोयते, स्कूड्रायव्हर साहित्य जप्त केले. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

उपनगरला खून 
संशयितांचा रविवारी (ता. १५) उपनगर येथील एका खुनाच्या प्रकरणात सहभाग असल्याचे पुढे आले आहे. त्याचप्रमाणे ताब्यात घेतलेला संशयित अमन याच्यावर मुंबई शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत.  

go to top