ज्येष्ठ नेते विनायक दादा पाटील यांचे निधन; नाशिकला शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

शेतकरी कुटुंबातील विनायकदादा यांनी कुंदेवाडीचे सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटविला. नाशिक जिल्ह्यात सहकार संस्थांचे जाळे तयार केले. वनशेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. वनशेती महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रयोग केले.

नाशिक : सरपंच ते राज्याचे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात आपला दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. रात्री 11.45 ला  त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील लीलावती रुग्णालयातून उपचार घेऊन आलेले होते. सध्या डायलिसिस सुरू होते. त्यांच्यावर आज सकाळी 10.15 नाशिकच्या गोदाकाठी अमरधाम मध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. पालकमंत्री छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांची ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली

सरपंच ते राज्याचे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात आपला दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व  गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील श्रद्धांजली अर्पण केली आहे.

"राज्याच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे नेतृत्व"

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, विनायकदादा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना कामाचा डोंगर उभा केला. शेतकरी कुटुंबातील विनायकदादा यांनी कुंदेवाडीचे सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटविला. नाशिक जिल्ह्यात सहकार संस्थांचे जाळे तयार केले. वनशेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. वनशेती महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रयोग केले. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक अशा त्यांच्या या प्रयोगाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. त्यासाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

कृषी, सहकार क्षेत्रात काम करणारे प्रयोगशील आणि ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले जात होते. राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आदराचे स्थान असलेले नेतृत्व आपण विनायकदादांच्या निधनामुळे गमावले आहे. ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना विनम्र श्रद्धांजली अशा भावना मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंनी व्यक्त केला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior leader Vinayak Dada Patil passes away nashik marathi news