मालेगाव पॅटर्नच्या कडू 'काढ्या'ची गोड कहाणी...ग्रामीण भागावर तर मोहिनीच!

घनश्‍याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

कसमादे भागासह नातेवाइकांनी काढा घ्यावा, असे सल्ले दिले जात आहेत. मौखिक लोकप्रियता लाभल्याने ग्रामीण भागात काढा घेण्याची चढाओढ लागली आहे. अनेक लोक मालेगावला येऊन युनानी काढा घेत आहेत. 

नाशिक/ दाभाडी : कोरोनावर मात करण्यासाठी मालेगावच्या युनानी काढ्याने ग्रामीण भागातील जनतेला भुरळ घातली आहे. अल्पावधीतच मालेगाव शहरातून कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने हा काढाच गुणकारी ठरत असल्याने "कडू काढ्याची गोड कहाणी' सध्या लोकप्रिय झाली आहे. काढा खरेदीसाठी मालेगावात दाखल झालेले नागरिक येथील दळणवळण पूर्ववत बघून आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. 

मालेगाव कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 

राज्यात कोरोनाच्या रुग्णात अव्वलस्थानी असलेले मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी मालेगावात मिळणारा जोशांदा काढा आणि सर्दी, खोकल्यावरील युनानी उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते बनविण्याची प्रक्रिया ग्रामस्थ समजून घेत आहेत. कसमादे भागासह नातेवाइकांनी काढा घ्यावा, असे सल्ले दिले जात आहेत. मौखिक लोकप्रियता लाभल्याने ग्रामीण भागात काढा घेण्याची चढाओढ लागली आहे. अनेक लोक मालेगावला येऊन युनानी काढा घेत आहेत. 

अतिशय स्वस्तातला हा उपाय

"मालेगावचा युनानी काढा' लोकप्रियतेत आघाडी घेत आहे. कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील दहशत आणि शहरातील बिनधास्त दळणवळण कोड्यात टाकणारे ठरत आहे. पानटपरी, सलून, चहा हॉटेल, फिरती दुकाने आदी सुरळीत सुरू असताना मास्क न घालताच मालेगाव शहर वावरत आहे. ही परिस्थिती बघून खरेदीदार कोड्यात पडत आहेत. काढा तयार करण्याची प्रक्रिया समजून घेत अतिशय स्वस्तातला हा उपाय करून बघू, असे म्हणत युनानी काढ्याची चर्चा होत आहे. 

नोकरदारांची पसंती 

मालेगावात नोकरीनिमित्त कार्यरत घटकांनी या काढ्यावर प्रथम पसंतीची मोहोर उमटवली. आता त्याचे लोन ग्रामीण भागात पसरत आहे. मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या रोडावल्याने या काढ्यावर विश्‍वासार्हता अधिक घट्ट झाली आहे. मन्सुरा हॉस्पिटलचे डॉ. सय्यद मिनहजसह व त्याच्या पथकाने मालेगाव भेटीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना या काढ्याविषयी माहिती दिली होती. शासन स्तरावरून या काढ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार

सोपी पद्धत, सहज बनविण्याच्या प्रक्रियेमुळे हा काढा घ्यायला आलो. शहरातील चलनवलन बघून आश्‍चर्य वाटले. पाण्यात उकळून हा काढा कुणीही सेवन करू शकतो. रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे काढा खरेदीसाठी आलो. - किरण पगार, पाडळदे ता. मालेगाव 

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweet story of bitterness of Malegaon pattern nashik marathi news