बदलीच्या प्रतीक्षेत चक्क 'रेशीमगाठी'च पणाला?...सोशल मीडियावर 'हुंकार'

teacher transfer.jpg
teacher transfer.jpg

नाशिक : (नांदगाव) राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात निमग्न असलेल्या पाचशेपेक्षा जास्त शिक्षिकांना संसाराच्या रेशीमगाठी सैल होत असल्याचा अनुभव सध्या घ्यावा लागतोय. पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत आंतरजिल्हा बदलीसाठी झटणाऱ्या व झिजणाऱ्या या शिक्षिकांचा हुंकार शासनाकडे पाठपुराव्यानंतर आता महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. यातील बहुतांश शिक्षिकांना आपल्या शिक्षक पतीपासून सातशे ते आठशे किलोमीटरवर काम करावे लागत आहे. 

"हिरकणी'चे जीवन जगतोय आम्ही 

नंदुरबारच्या एका टोकाला असलेल्या खापर या गावात श्री. जांभळे शिक्षक आहेत. दिव्यांग पत्नी साधना हिरे यांची नियुक्ती मात्र बीड जिल्ह्यात आहे. मूळच्या जालना येथील साधनाताईंना दोन वर्षांचे बाळ आहे. त्याला घरी सोडून जावे लागते. ललिता विश्‍वनाथ बानगुडे यांचे सासर अन्‌ पतीची नोकरीही बीड जिल्ह्यात. तर ललिता यांची नोकरी कोकणात रायगड येथे. त्यांच्या सात महिन्यांच्या बाळाला कोकणातील हवामान मानवत नसल्याने त्याला पाचशे किलोमीटरवर आजी-आजोबांकडे ठेवून कर्तव्य पार पाडत आहेत. वाशीम येथे कार्यरत असलेल्या आलम बेगम शेख साडेतीनशे किलोमीटरवरील शाळेत, तर पतीची बदली आठशे किलोमीटरवरील गावात. त्यामुळे त्यांनी मुलांना लातूरला नातेवाइकांकडे ठेवले आहे. सोनाली मोडकर पतीपासून सहाशे किलोमीटरवर दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. संसाराला दहा वर्षे झाली, तरीही एकाकी जीवन जगल्यासारखे जीवन कंठत आहेत. असुरक्षितता व भीतीच्या सावटाखाली कार्यरत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. सिल्लोडच्या सुलोचना नारायण चव्हाण यांनी, तर शिवकालीन हिरकणीने आपल्या लेकरासाठी केलेल्या संघर्षांशी तुलना करीत, दूर अंतरावरच्या शिक्षिकांच्या व्यथा प्रातिनिधिक स्वरूपात मांडल्या.  

...तेव्हा मी खूप आगतिक होते 

आज ना उद्या बदली होईल व आपण आपल्या जिल्ह्यात जाऊ, या आशेने 13 वर्षांपूर्वी कोकणात नोकरी पत्करली. आठ वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघा चिमुकल्यांना सोबत घेऊन संसाराचा गाडा हाकावा लागतोय. पती महिन्यातून एकदा भेटायला येतात. दोन-तीन दिवस थांबून जेव्हा ते परत जायला निघतात, तेव्हा त्यांच्यातील "बाप' डोळे भरून आले तरी, हसण्याचा आव आणतो अन्‌ मुले बाबाला घट्ट मिठी मारून "बाबा जाऊ नका' म्हणून धाय मोकलून रडतात, तेव्हा मी खूप अगतिक होते, अशा शब्दात अनिता मोहन चांदगुडे यांनी त्यांची व्यथा कथन केली. त्या सध्या रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत. 

वनवास संपेल, असे वाटत नाही 

औरंगाबादच्या शिवबाई भागवत पाटील म्हणाल्या, की रामायणात रामाचा वनवास तरी 14 वर्षांचाच होता. मी मात्र 15 वर्षांपासून वनवासात आहे. आता तर हा वनवास संपेल याची, अंधुकशी आशासुद्धा आम्हाला वाटत नाही. आपल्या संस्कृतीत खरंतर पत्नी ही पतीच्या घरी असते. मी मात्र पाहुण्यासारखं सासरी जाते, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com