आनंदवार्ता! जिल्ह्यातील 'हे' चार तालुके झाले कोरोनामुक्‍त...एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

शहरासह जिल्हाभरातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतांना, एक दिलासादायक माहिती जारी करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी (ता.27) प्राप्त अहवालानुसार देवळा, सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुक्‍यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला नाही.

नाशिक : शहरासह जिल्हाभरातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतांना, एक दिलासादायक माहिती जारी करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी (ता.27) प्राप्त अहवालानुसार देवळा, सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुक्‍यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला नाही अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

कोरोनामुक्‍तीच्या दिशेने पाऊल ठेवले

जिल्ह्यातील 1 हजार 911 कोरोना बाधितांना डिस्चार्ज दिला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 430 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वांसाठी हा चिंतेचा विषय ठरला होता. प्रामुख्याने शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याची चित्र बघायला मिळत होते. ग्रामीण भागातील कोरोनाने पाय पसरविले असतांना, जिल्हा प्रशासनापुढे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान बळावत चालले होते. मात्र दिलासादायक बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्‍यांनी कोरोनामुक्‍तीच्या दिशेने पाऊल ठेवले आहे. यासंदर्भातील आकडेवारी शनिवारी (ता.27) सकाळी अकराला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून उपलब्ध करून दिली आहे. 

अशी आहे उपचार घेत असलेल्यांची सद्यस्थिती 

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक तालुक्‍यात 69, चांदवड 9, सिन्नर 36, दिंडोरी 12, निफाड 40, नांदगांव 18, येवला 39, त्र्यंबकेश्वर 4, बागलाण 12, इगतपुरी 23, मालेगांव ग्रामीण 6 असे एकूण 268 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सुरगाणा, देवळा, पेठ, कळवण या चार तालुक्‍यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाहीत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सकाळी हसतमुख दिसलेल्या लेकीची दुपारी डेडबॉडीच...आईने फोडला हंबरडा

महापालिका क्षेत्रांची स्थिती अशी 

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 996, तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 127 आणि जिल्ह्याबाहेरील 39 असे एकूण 1 हजार 430 रुग्णांवरदेखील उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 3 हजार 554 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

दोनशेहून अधिक मृत्यू 

कोरोनामुळे जिल्ह्यात मृतांचा आकडा दोनशेपार पोहोचला आहे. यात नाशिक ग्रामीणमध्ये 38 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 91, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 73 व जिल्हा बाहेरील 11 अशा एकूण 213 रुग्णांचा मृत्यु झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा > सावध व्हा...'हा' आजार पडेल महागात...कोरोनाचे व्हाल बळी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These four talukas of the district have been corona free Nashik Marathi News