खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

savkari.jpg
savkari.jpg

म्हसरूळ (नाशिक) : आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून दोघांचे अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे खासगी सावकारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

असा आहे प्रकार

प्रवीण विभांडिक (रा. जेल रोड) आणि बबन शिंदे (रा. चाडेगाव, सामनगाव रोड, ता.जि. नाशिक) हे दोघे भागीदारीत बांधकाम व्यवसाय करतात. व्यवसायासाठी त्यांनी आबा चौधरी यांच्याकडून ३० ते ३५ लाख रुपये व्याजापोटी घेतले होते. सुरवातीस व्याजाची रक्कम परत करत होते; परंतु कोरोनाकाळात या दोघांचाही व्यवसाय अडचणीत आला. यामुळे व्याजाची रक्कम देण्यास अडचण येऊ लागली. संशयित आबा चौधरी यांनी प्रवीण व बबन यांना जेल रोड सावरकरनगर येथील कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर इनोव्हा कारमध्ये बसवून आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील काकाश्री हॉटेल येथे घेऊन गेले. तिथे त्यांच्याशी दिलेल्या रकमेवरून वाद घालत दोघांना बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांना या घटनेची कुणकुण लागल्याने संशयितांचे धाबे दणाणले. त्यानंतर त्यांनी या दोघांना सोडून दिले. मात्र, या दोघांनीही थेट आडगाव पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार कथन केला. मात्र, पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला. अखेर या नातेवाइकांनी ठाण्यात गोंधळ घालत पोलिसांवर तक्रार दाखल करून घेण्यास दबाव आणल्यानंतर तक्रार दाखल केली. या प्रकरणातील संशयित आबा चौधरीसह संशयित फरारी झाले आहेत. प्रवीण व बबन यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

खासगी सावकारी चर्चेत 

पंचवटी, नाशिक रोड या भागात खुलेआम ‘खासगी सावकारी’ सुरू आहे. या खासगी सावकारीला अनेक जण बळी पडलेले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. या कथित सावकारांवर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वरदहस्त असल्याने भीतीपोटी कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाही. यामुळे या प्रकारांना बळ मिळत आहे. या प्रकारामुळे खासगी सावकारी चर्चेत आली आहे. पोलिसांनी अशा प्रकरणांत सखोल तपास करून खासगी सावकारीला चाप लावण्याची गरज आहे. 

सामाजिक कार्यकर्ते वेळीच धावले 

या प्रकरणी माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते प्रभाग दोन नगरसेविका पूनम सोनवणे, माजी नगरसेवक हरीश भडांगे, संतोष पिल्ले, आकाश भालेराव, प्रकाश तेलोरे, भगवत पाठक, शिवा ताकटे, सागर भोजने, संजय साबळे आदींनी आडगाव पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com