रिक्षांचे अनधिकृत थांबे ठरताय नाशिककरांसाठी डोकेदुखी; पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

युनूस शेख
Tuesday, 19 January 2021

अशा ठिकाणी बहुतांशी रिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करून प्रवाशांची वाट पाहत असतात. दोन्ही रस्त्यांकडून रविवार कारंजाच्या दिशेने येणारी किंवा मेन रोडकडे जाणारी विविध वाहने मार्गक्रमण करत असतात. त्यात पायी चालणारे नागरिक यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते.

जुने नाशिक : मेन रोड प्रवेशमार्गावर रिक्षाचालकांकडून रिक्षा रस्त्यात उभ्या करून अनधिकृत ठिय्या मांडण्याचा प्रकार दैनंदिन घडत असतो. वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघातही घडतात. त्यातून वादास तोंड फुटत असते. विशेष म्हणजे चांदीच्या गणपती मंदिर परिसरात नियुक्तीस असलेल्या पोलिसाच्या डोळ्यांसमोर प्रकार घडतो. तरीदेखील त्यांच्याकडून कुठली कारवाई होत नाही.

नागरिक, व्यावसायिक त्रस्त 

मेन रोड, बोहरपट्टी मुख्य बाजारपेठ आहे. चांदीचा गणपती मंदिर येथून एक रस्ता मेन रोड, तर दुसरा रस्ता बोहरपट्टी आणि सराफ बाजाराकडे जातो. अशा ठिकाणी बहुतांशी रिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करून प्रवाशांची वाट पाहत असतात. दोन्ही रस्त्यांकडून रविवार कारंजाच्या दिशेने येणारी किंवा मेन रोडकडे जाणारी विविध वाहने मार्गक्रमण करत असतात. त्यात पायी चालणारे नागरिक यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. अशा वेळेस वाहनांचे होणारे किरकोळ स्वरूपाचे अपघात, तसेच नागरिकांना वाहनाचा लागणारा धक्का यामुळे बऱ्याच वेळा वाद होतात. हे चित्र दररोज पाहावयास मिळते. शिवाय परिसरातच काही व्यावसायिकांकडून रस्त्यावर दुकाने लावली जातात. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

युवतींच्या छेडखानीचे प्रकारही...

त्या अतिक्रमणामुळे समस्येत आणखीच भर पडते. इतकेच नाही, तर रिक्षाचालकांना कुणी समजावण्यास गेले की त्यांच्याकडून वाद घातले जातात. अनेक वेळा रस्त्याने जाणाऱ्या युवतींच्या छेडखानीचे प्रकारही होत असतात. विशेष म्हणजे परिसरात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह सरकारवाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी नियुक्त असूनदेखील त्यांच्यासमोर प्रकार घडत असतात. सामान्य नागरिक किंवा परिसरातील व्यावसायिक त्यांना बोलून वाद का ओढून घ्यायचा, अशा मनःस्थितीत असतात. शनिवार, रविवारसह अन्य सुट्यांच्या दिवशी बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्या वेळेस वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जाणवते. वाहतूक पोलिसांनी त्या रिक्षाचालकांवर कारवाई करत त्यांचा तेथील थांब्यास मज्जाव करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized stop of rickshaws causes traffic jam in Nashik marathi news