कृषिनिविष्ठा खरेदी-विक्रीत पिंपळगाव ठरतेय अव्वल; वर्षाकाठी ५०० कोटींची उलाढाल 

एस. डी. आहिरे
Sunday, 4 October 2020

औषधे खरेदीसाठी पिंपळगाव ही शेतकऱ्यांना विश्‍वासाची बाजारपेठ वाटते. त्यामुळे स्थानिकांबरोबरच बाहेरील शेतकऱ्यांची औषधे, बियाणे व खते खरेदीसाठी पिंपळगावच्या दुकानांमध्ये झुंबड उडते. इतर ठिकाणपेक्षा स्वस्त व दर्जेदार कृषिनिविष्ठा येथे मिळत असल्याचा शेतकऱ्यांना दृढविश्‍वास आहे. 

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) द्राक्षनगरी, कांदा-टोमॅटोची राजधानी अशी बिरुदावली मिरवणारे पिंपळगाव बसवंत कीटकनाशके, रासायनिक खते व बियाणे विक्रीची बाजारपेठ म्हणूनही उदयास येत आहे. यामुळेच पिंपळगावमध्ये वर्षाकाठी सुमारे ५०० कोटींची उलाढाल कृषिनिविष्ठा खरेदी-विक्रीतून होत आहे. परराज्यांसह परजिल्ह्यांतून येथे कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकरी येत असल्याने पिंपळगावचे मार्केट आता कृषिनिविष्ठा विक्रीत नाशिक जिल्ह्यात नव्हे, उत्तर महाराष्ट्रातही अव्वल म्हणून पुढे येत आहे.

व्यापार उदिमाने मोठी उसळी 

शेतीत प्रगत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंतच्या द्राक्षांची ओळख सातासमुद्रापार आहे. महामार्गावर वसलेले शहर, रोख पेमेंट, भव्य बाजार समिती यामुळे शहरातील व्यापार उदिमाने मोठी उसळी घेतली. म्हणायला ग्रामीण पण येथील शेतकरी व व्यापाऱ्यांनी सचोटीच्या बळावर पिंपळगावला शहराचा लूक दिला. पिंपळगावमधील विविध व्यवसायांमध्ये कृषिनिविष्ठा विक्रीतून होणारी उलाढाल नाशिक जिल्ह्यात उच्चांकी आहे.

 उलाढालाची आलेख उंचावणारा

रोख पेमेंट व उच्चांकी बाजारभावामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून शेतकरी कांदा, टोमॅटोसह शेतीमाल विक्रीसाठी पिंपळगाव बाजार समितीत येतात. खिशात खुळखुळणाऱ्या पैशातून शेतीसाठी लागणारी चीजवस्तू पिंपळगाव शहरातून खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. पंधरा वर्षांपूर्वी जेमतेम असलेली कृषी सेवा केंद्र व त्यांची उलाढालाची आलेख दर वर्षी उंचावत आहे. पिंपळगावमध्ये पानटपरीपेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र असून, त्यांची संख्या आता शंभरच्या घरात पोचली आहे. दर वर्षी किमान दोन-चार नवीन दुकानांचा येथे प्रारंभ होतो.

स्वस्त व विश्‍वासाची बाजारपेठ 

शेतीपिकावर फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांमध्ये बनावटीचे अनेक प्रकार इतर ठिकाणी उघडकीस आले. पिंपळगाव बसवंत बाजारपेठ मात्र याला अपवाद आहे. औषधात फसवणुकीचे प्रकार येथे घडलेले नाहीत. औषधे खरेदीसाठी पिंपळगाव ही शेतकऱ्यांना विश्‍वासाची बाजारपेठ वाटते. त्यामुळे स्थानिकांबरोबरच बाहेरील शेतकऱ्यांची औषधे, बियाणे व खते खरेदीसाठी पिंपळगावच्या दुकानांमध्ये झुंबड उडते. इतर ठिकाणपेक्षा स्वस्त व दर्जेदार कृषिनिविष्ठा येथे मिळत असल्याचा शेतकऱ्यांना दृढविश्‍वास आहे. 

अनेकांच्या हाताला काम

येथील व्यावसायिकांमध्ये आर्थिक क्षमता असल्याने एप्रिल ते जून या मंदीच्या काळात उत्पादक कंपन्यांकडून ऑॅफर रेटमध्ये मालाची नोंदणी करून ठेवली जाते. त्याचा परिणाम हंगामावेळी कंपन्या चढ्या दराने दुकानदारांना माल देतात. पिंपळगावचे व्यावसायिक मात्र स्वतः दरातील माल कमी नफा ठेवून शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे येथील कृषी केंद्रांना शेतकऱ्यांची पसंती असते. सर्व कंपन्यांचे डिलर्स व राज्यात नामांकित साखळी व्यावसायिकांच्या शाखा पिंपळगावमध्ये आहेत. शंभर दुकानांमध्ये सुमारे पाचशे तरुण व टेम्पोचालक, हमाल यांच्या हाताला काम मिळाले आहे. लेखापाल, मदतनीस, संगणकचालक अशी पदे या दुकानांत भरली आहेत.

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

उधारीचे ग्रहण अन कृषी अधिकाऱ्यांकडून छळ 

कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय भरभराटीला असला तरी काही शाप त्याला लागले आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उधारीने माल द्यावा लागतो, ही मोठी समस्या व्यावसायिकांना भेडसावते. काही ठकबाज ग्राहक एकाकडून उधारी थकविल्यानंतर दुसऱ्या दुकानात खाते उघडायचे, असे सुरू असते. यात अनेक व्यावसायिक बरबाद झाले. सध्या उधारीचे प्रमाण कमी असले तरी ते पूर्ण थांबलेले नाही. उधारीचे ग्रहण असताना शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांकडून कृषिनिविष्ठा व्यावसायिकांचा छळ सुरू असतो. गुणवत्ता नियंत्रण, जिल्हा व तालुक्याची कृषी अधिकारी फरारी पथकांच्या नावाखाली दुकानदारांचा चिरीमिरीसाठी छळ मांडत असल्याचा आरोप केला जातो.

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

(संपादन : भीमराव चव्हाण)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this village is ahead for agri material business nashik marathi news