"वर्दी अंगावरच ठेवली, ती डोक्यात जाऊ दिली नाही!; नाशिकमधील कामकाजाबाबत विश्वास नांगरेंनी सांगितला अनुभव

विनोद बेदरकर
Friday, 4 September 2020

"कोरोनाच्या निमित्ताने कुटुंबाच्या आणखी जवळ गेलो. वर्दी अंगावरच ठेवली. ती डोक्यात जाऊ दिली नाही. वैयक्तिक आयुष्य, प्रशासकीय कामकाज आणि सामाजिक माणूसपण या तिन्ही गोष्टींत गल्लत केली नाही. तिन्ही बाजू स्वतंत्र ठेवूनच जगलो.

नाशिक : "कोरोनाच्या निमित्ताने कुटुंबाच्या आणखी जवळ गेलो. वर्दी अंगावरच ठेवली. ती डोक्यात जाऊ दिली नाही. वैयक्तिक आयुष्य, प्रशासकीय कामकाज आणि सामाजिक माणूसपण या तिन्ही गोष्टींत गल्लत केली नाही. तिन्ही बाजू स्वतंत्र ठेवूनच जगलो. यात नाशिकच्या कार्यकाळातील अनुभव आणि कोरोना महामारीतील अनुभवाच्या अनुषंगाने पुस्तक लिहित असून, लवकरच हे पुस्तक येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

चिटपाखरूही कैद होईल, असे सीसीटीव्हीचे जाळे शक्य 

नाशिक शहर इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हेलन्सखाली आणण्यासाठी पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे. शासनाने आतापर्यंत ५६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सगळे काम शासनच करेल, अशी अपेक्षा न धरता नाशिकच्या खासगी संस्थांनी पुढाकार घेऊन राहिलेले कॅमेरे बसविले, तर ‘यहा परिंदा भी पर न मार सके’ अशी नाशिकची सुरक्षा व्यवस्था बळकट होऊन पोलिसांना रस्त्यावर उभे राहून पावत्या फाडण्याऐवजी गुणात्मक कामावर लक्ष देता येईल, अशी अपेक्षा मावळते पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली. नांगरे-पाटील यांची मुंबईला बदली झाली. नाशिकमधील दीड वर्षाच्या कामकाजाबाबत ते पत्रकारांशी बोलत होते.

पोलिसांवरील भार कमी करण्यासाठी खासगी संस्थांनी पुढे येण्याची गरज 

नांगरे-पाटील यांची मुंबईला बदली झाली. नाशिकमधील दीड वर्षाच्या कामकाजाबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की दोन निवडणुका, कोरोना, अयोध्या येथील राममंदिराच्या निकालादरम्यानचा बंदोबस्त अशा महत्त्वाच्या घटनांना तोंड देताना शहरातील कमांड कंट्रोल रूमचे महत्त्वाचे कामकाज झाले. पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेले ग्रंथालय, उद्यान, मॅरेथॉनपासून तर अनेक सामाजिक उपक्रम पुढे नेता आले. प्रत्येक चौकीसाठी एक उपनिरीक्षक अशी जबाबदारी निश्‍चित केली. चौक्यांचे स्वरूप बदलले. शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्यासाठी भक्कम कमांड कंट्रोल रूम भक्कम करताना स्वतंत्र सॉफ्टवेअरमुळे पोलिसांचे साडेपाचशे तर खासगी चारशे याप्रमाणे नऊशे कॅमेरे सध्या निगराणीखाली आणले. शहराला आणखी साडेचार हजार कॅमेऱ्यांची गरज आहे. नाशिकच्या खासगी संस्थांनी प्रत्येकी दोन- दोन कॅमेरे बसविले तरी प्रत्येक कॅमेरा हा पोलिस या न्यायाने कामकाज होईल. पोलिसांना रस्त्यावर पावत्या फाडण्याऐवजी इतर कामांवर लक्ष देता येईल. माझ्यानंतर हे काम पुढे जावे ही अपेक्षा आहे. 

तीन सहकारी गेल्याचे दुःख 
कोरोनाच्या काळात अनेक प्रयत्न केले. पोलिसांच्या आरोग्यासाठी मुंबईतील संस्थांच्या मदतीतून घड्याळ, विविध काढे, सी व्हिटॅमिन, च्यवनप्राश यांसह मानसिक उभारी देण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र अशाही स्थितीत तीन सहकारी कोरोनापासून वाचवू शकलो नाही, याचा खेद आहे. कुटुंबातील विवाहात नृत्य केल्याचा बाला डान्स व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्याचा थोडा त्रास झाला. याशिवाय अभिनेता अक्षयकुमार याचे हेलिकॉप्टर उतरले, लोक जमले त्याचा अक्षयकुमारला त्रास झाल्याचा मला त्रास झाला. वास्तविक तो नाशिकला पोलिसांच्या काही उपक्रमांसाठी येणार होता. पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थीसमोर त्याचे प्रात्यक्षिक होणार होते, त्याचा त्रास झाला अशी प्रांजल कबुलीही त्यांनी दिली. 

हे केल्याचे समाधान 
- २३ चौक्या अद्ययावत करून उपनिरीक्षकावर जबाबदारी 
- पूर्वीपासून सुरू असलेल्या सोशल पोलिसिंगला गती दिली 
- शहर इलेक्ट्रॉनिक्स निगराणीखाली आणायची सुरवात 
- मुथुट फायनान्स या आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vishwas nangre patil said about experience in nashik marathi news