देवस्थानांवर व्यापाऱ्यांऐवजी वारकरी नेमावेत; वारकऱ्यांची मागणी 

विनोद बेदरकर
Saturday, 21 November 2020

नवीन विश्‍वस्त निवडीसाठी वारकरी तयारीला लागले आहेत. नवीन विश्‍वस्त नेमताना व्यापारी नव्हे तर वारकरी असलेल्यांना स्थान द्यावे, अशी मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली. 

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान विश्‍वस्त मंडळाची मुदत संपल्याने नवीन विश्‍वस्त निवडीसाठी वारकरी तयारीला लागले आहेत. नवीन विश्‍वस्त नेमताना व्यापारी नव्हे तर वारकरी असलेल्यांना स्थान द्यावे, अशी मागणी करण्यात आली. 

मंदिर संचालक निवडताना सर्वानुमते एक लवादाची नेमणूक करा

महामंडलेश्वर आचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात ही मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील कीर्तनकार, वारकरी उपस्थित होते. बैठकीत संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या अपूर्णावस्थेतील मंदिराच्या बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मंदिर संचालक निवडताना सर्वानुमते एक लवादाची नेमणूक करावी. लवाद नेमल्याने केवळ वारकरी लोकच संस्थानवर जातील व व्यापारी वृत्तीच्या लोकांना या महान समाधी संस्थानचे दरवाजे कायमचे बंद होतील, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत नवीन संचालक निवडत नाही तोपर्यंत कोणताही निधी मंदिर ठेकेदाराला विद्यमान संचालकानी देऊ नये यासाठी बैठकीत एकमुखी निर्धार करण्यात आला. नवीन संचालक मंडळात जिल्हानिहाय संचालक कमिटी तयार करण्याचे ठरले. विद्यमान संचालकांऐवजी नवीन संचालकांना संधी देण्याची मागणी करण्यात आली. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

नाशिक - निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्टबाबत वारकरी बैठक 
बैठकीसाठी ह.भ.प. दामोदर महाराज गावले, बाळासाहेब काकड, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष अण्णा महाराज हिसवळकर, माधवदास महाराज राठी, अमर ठोंबरे, दत्तू पाटील डुकरे, लहानू पेखले, महंत संपत धोंगडे, पोपटराव फडोल, नितीन सातपुते, विठ्ठल शेलार, आबासाहेब मुरकुटे, प्रवीण वाघ आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warakaris should be appointed instead of traders at temples nashik marathi news