Video : धुळे जिल्ह्यात केमिकल कंपनीत स्फोट; 16 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

रुमिथ केमसिंथ ही कंपनी ऑगस्ट 2018 मध्ये मुंबई येथील चार भागीदाराकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यापूर्वी मा बिजासनी पेट्रोकेमिकल्स या नावाने ही कंपनी सुरू होती. औषधांसाठी आवश्यक असलेल्या रसायनांचे उत्पादन तेथे सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटानंतर तेथील ढिगाऱ्याखाली आणखी काही मृतदेह अडकल्याची शक्यता आहे.

धुळे : शिरपूर तालुक्यातील वाघाडी शिवारात आज (शनिवार) सकाळी नऊच्या सुमारास रुमिथ केमसिंथ या रसायन निर्मात्या कंपनीत स्फोट झाल्याने 16 जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे 64 जण जखमी झाले आहेत. दुर्घटनास्थळी अद्यापही काही मृतदेह अडकल्याची भीती आहे. दुर्घटनेची व्याप्ती वाढण्याच्या भीतीने परिसरातील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्ती नियंत्रण दलाचे पथक, जिल्हाभरातील अग्निशामक दल, पोलिस यंत्रणा आणि प्रशासन आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

शिरपूर-शहादा रस्त्यावर बाळदे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हा कारखाना आहे. सकाळी नऊला शिफ्ट संपल्यानंतर कामगार बाहेर पडत होते, तर सकाळच्या शिफ्टचे कामगार आत प्रवेश करीत होते. त्याचवेळी कारखान्यातील संयंत्रातून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच व्यवस्थापनाने कामगारांना तातडीने बाहेर जाण्याचा इशारा दिला. कामगार बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच संयंत्राचा स्फोट झाला. त्यात 16 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार बालकांचाही समावेश आहे. कारखान्या लगत राहणाऱ्या कामगारांची ही मुले असल्याचे कळते. स्फोटाचा हादरा परिसरातील दहा किमीपर्यंत बसला. त्यामुळे नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोग्य विभागाला जाग येण्यापूर्वीच जखमींना दुचाकीवरून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू झाले. स्फोटांबाबत माहिती कळताच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. उपजिल्हा रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय यासह शहरातील सेवाभावी संस्थांच्या रुग्णवाहिकाद्वारे मृत आणि जखमींची वाहतूक करण्यात आली. शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा येथील पालिका व धुळे महापालिकेचे अग्निशमन दल आग विझवण्याची शिकस्त करत होते. पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. हिना गावित, आमदार काशीराम पावरा, जिल्हाधिकारी डी. गंगाधरण, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांनी घटनास्थळासह उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. जखमींची चौकशी करून उपचाराबाबत निर्देश दिले.

रुमिथ केमसिंथ ही कंपनी ऑगस्ट 2018 मध्ये मुंबई येथील चार भागीदाराकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यापूर्वी मा बिजासनी पेट्रोकेमिकल्स या नावाने ही कंपनी सुरू होती. औषधांसाठी आवश्यक असलेल्या रसायनांचे उत्पादन तेथे सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटानंतर तेथील ढिगाऱ्याखाली आणखी काही मृतदेह अडकल्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 dead in blast at chemical company in Dhule