esakal | नाशिकचा गोविंद विडा पोचला परराज्यात
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक - गोविंद विड्याची आकर्षक सजावट.

गोविंद  विड्याची वैशिष्ट्ये
गोविंद विड्यात विशिष्ट प्रमाणात चुना लावला जातो. त्यात गुलाबपाणी, लोणी यांचे मिश्रण असते. सोबत सुपारी, बडीशेप, सुकामेवा, गुलाबपाकळी, गुलकंद, मध, केशर, अस्मनतारा, वेलची, लवंग, ओवा, ज्येष्ठमध, कंकोळ, तीळ, खोबरे, पत्री, खडीसाखर, काळे मनुका, कापूर, स्वर्णभस्म, चांदीचा वर्ख अशा ५२ प्रकारच्या बहूगुणी व आयुर्वेदिक वस्तू त्यात मिश्रित केल्या जातात.

नाशिकचा गोविंद विडा पोचला परराज्यात

sakal_logo
By
भाग्यश्री गुरव

नाशिक - गणपतीचे आगमन झाले की महिलावर्गाला वेध लागतात ते ज्येष्ठागौरी आगमनाचे. दोन दिवसांनी आगमन होणाऱ्या गौरींसाठी अनेक प्रकारची मिठाई, फराळाचे पदार्थ, तसेच खास नैवेद्यदेखील दाखविले जातात. दुसऱ्या दिवशी जेवणानंतर गौरीला गोविंद विड्याचा नैवेद्य दाखविला जातो.

फक्‍त नाशिकलाच तयार होणाऱ्या या गोविंद विड्याला मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर शहरांमधून, तसेच थेट इंदूरहूनही मागणी होतेय. पाचशे रुपयांपासून तर अडीच हजार रुपये जोडी या दराने गोविंद विडा उपलब्ध आहे.

गौराईसाठी पंकज लहामगे यांनी देवीच्या आकाराचा विडा बनविला आहे. या विड्यासाठी पंधरा दिवस आधीपासून बुकिंग केले जाते. पूर्वापार चालत आलेल्या गौरींसाठी फार पूर्वीपासून विड्याचा महिमा घरोघरी पोचलेला आहे. ओठांवरील लाली पसरवणारा विडा गप्पांचा रंगदेखील द्विगुणित करतो. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात विड्याच्या पानाचा वापर केला जातो. विड्याला तांबूल असेही म्हणतात. विड्याचे १३ गुण आहेत. त्यावरून त्याला त्रयोदशगुणी तांबूल असेही म्हणतात.

या विड्याला चारही बाजूंनी वस्त्राने सजविले जाते. चेरीचा मुखवटा, लवंगाचे डोळे असा विविध प्रकारांनी सजवून महालक्ष्मीचे स्वरूप देण्यात येते. एखाद्या आकर्षक शिल्पाप्रमाणे या विड्याची सजावट केलेली असते. विड्यासाठी लागणारी वस्त्रे मथुरेहून आणली आहेत, तर दागिने नाशिकच्या सराफांकडून बनवून घेतले आहेत.

आम्ही गेल्या तीन पिढ्यांपासून शास्त्रशुद्ध पद्धतीने गोंविद विडा बनवत आहोत. त्यामुळे संपूर्ण राज्यातून, तसेच राज्याबाहेरूनही विड्याची मागणी वाढत आहे. ना नफा- ना तोटा या तत्त्वावर मर्यादित गोविंद विडा आम्ही तयार करताना धार्मिक परंपरा जोपासतो.
- पंकज लहामगे,  साईछत्र पान स्टॉल

loading image
go to top