परिस्थितीवर मात करत थेट मंत्रालयात...

बापूसाहेब वाघ : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही क्षेत्रात उज्वल भविष्य व ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती,मनाची तयारी, अभ्यास करण्याची क्षमता असेल तर नक्कीच यशाचा मार्ग दिसतो याची प्रचिती सातारे ता.येवला येथील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील तरूणाची मुंबई येथे मंत्रालयात माहिती व तंत्रज्ञान सहाय्यक पदी निवड झाल्याने सिद्ध झाले.सचिन साहेबराव देव्हडराव हे या यशस्वी तरूणाचे नाव.

येवला : प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही क्षेत्रात उज्वल भविष्य व ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती,मनाची तयारी, अभ्यास करण्याची क्षमता असेल तर नक्कीच यशाचा मार्ग दिसतो याची प्रचिती सातारे (ता.येवला) येथील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील तरूणाची मुंबई येथे मंत्रालयात माहिती व तंत्रज्ञान सहाय्यक पदी निवड झाल्याने सिद्ध झाले.सचिन साहेबराव देव्हडराव हे या यशस्वी तरूणाचे नाव..

ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुकर करणे हेच ध्येय
किराणा व्यावसायिक साहेबराव देव्हडराव यांचे शिक्षण जेमतेम चौथी पर्यंत झाले. परंतु आपल्या मुलांनी उच्चशिक्षित व्हावे यासाठी आपल्या व्यवसायातून पै-पै जमा करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.सचिन व समाधान यांनी आपल्या आई वडीलांंची इच्छा सार्थ ठरवत उच्च शिक्षण घेतले.समाधान देव्हडराव याने बीए डी.एड शिक्षण पूर्ण केले. तर मंत्रालयात निवड झालेल्या सचिनचे प्राथमिक शिक्षण सातारे गावातच पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण जळगाव नेऊर येथील शाळेत पुर्ण केले.उच्च शिक्षण करून एक सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून पुणे येथे सेंट्रल वाटर आणि पावर रिसर्च सेन्टर येथे नोकरी स्विकारली.नोकरी करत असतानाच सचिनची निवड मंत्रालयात झाली.आपले ध्येय मनाशी ठेवत यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू ठेवली. जिल्हाधिकारी बनून ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुकर करणे हे त्याचे स्वप्न आहे.

जिद्द चिकाटीने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे

10 ऑक्टोबरला माहिती व तंत्रज्ञान सहाय्यक म्हणून तो मंत्रालयात रुजू होणार आहे.या पदासाठी महाराष्ट्रातुन दोन जागा भरण्यात आल्या असून देव्हडराव यांचा यात प्रथम क्रमांक आहे.कुटुंबात आई वडील यांचे शिक्षण अल्प असले तरीही सचिन देव्हडराव याने प्रतिकूल परिस्थीतीतुन शिक्षणाची कास धरत जिद्द चिकाटीने उच्च शिक्षण पुर्ण करत मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे.त्याच्या या निवडीची वार्ता सातारे गावात समजल्यावर त्यावर अक्षरशः अभिनंदनाचा वर्षाव झाला.

सोशल मिडीयावर "मातृभमी ते मंत्रालय सार्थ निवड" पोस्ट व्हायरल

सोशल मिडीयावर मातृभमी ते मंत्रालय सार्थ निवड अशा पोस्ट व्हायरल करून अभिनंदन करण्यात आले.सचिनच्या या यशात वडील साहेबराव देव्हडराव,आई जिजाबाई देव्हडराव यांचा मोलाचा वाटा आहे.जळगाव नेऊर येथील जनता विद्यालयातील माजी विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचल्याने शिक्षकांनी ही सचिनचे भरभरून कौतुक केले.

चिमूटभर यश हे साध्य नाही

मिळालेले हे चिमूटभर यश हे साध्य नसून माझ्या पुढील ध्येयासाठी एक साधन आहे...! महाराष्ट्राच्या ध्येय धोरणांमध्ये खारीचा वाटा उचलून मंत्रालया सारख्या व्यासपीठावर सेवा करण्याची संधी मिळाली. याचा सार्थ अभिमान वाटतो. मंत्रालयातील अनुभव हा माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी असेल.मंत्रालयाच्या इमारतीला आजपर्यंत बातम्यांमधेच बघायचो कधी विचारसुद्धा केला नव्हता की इथे सेवा करण्याचा योग येईल.शिक्षक बाळासाहेब सोमासे यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले.- सचिन देव्हडराव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा