शहरात 42 कोटींची कामे  लवकरच लागणार मार्गी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

शहरी नगरोत्थान योजनेंतर्गत 100 कोटींपैकी 42 कोटींच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राबविलेल्या निविदा प्रक्रियेतील कामे पुन्हा सुरू होण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांच्यासह नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली.

जळगाव,ः शहरातील विकास कामांकरिता विविध योजनेअंतर्गत शासनाने वितरित केलेल्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांना शासनाने लावलेली स्थगिती मंगळवारी (ता. 21) उठवली. शहरी नगरोत्थान योजनेंतर्गत 100 कोटींपैकी 42 कोटींच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राबविलेल्या निविदा प्रक्रियेतील कामे पुन्हा सुरू होण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांच्यासह नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली. 42 कोटीतील कामांसाठी निविदा उघडण्यात आल्या असून पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

सार्वजनिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या दालनात उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, ऍड. शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नितीन बरडे, विशाल त्रिपाठी, अतुलसिंग हाडा, ऍड. दिलीप पोकळे, सुनील खडके, प्रशांत नाईक, डॉ. चंद्रशेखर पाटील, गजानन देशमुख, किशोर चौधरी, शहर अभियंता सुनील भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. वीरेन खडके, किरण बेंडाळे आदी उपस्थित होते. 

मंत्रालयातून मंजुरी घ्यावी लागणार 
शासनाने नगरोथान योजनेंतर्गत मंजूर 100 कोटींच्या निधीपैकी 42 कोटीतील कामांच्या निविदा उघडण्यात आल्या होत्या, परंतु त्यानंतर शासनाचे आदेश आल्याने त्यास स्थगिती मिळाली. आता स्थगिती दूर झाली असल्याने आणि कामे पंधरा कोटींपेक्षा अधिकची असल्याने त्याबाबतचा प्रस्ताव नाशिक विभागीय कार्यालयात पाठवून त्यास मंत्रालयातून मंजुरी घ्यावी लागेल. त्याबाबत तत्काळ पाठपुरावा करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सोनवणेंनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 crore works will be started in the city soon