धुळ्यात 50 हजारांसह गॅस लायटर सापडले

विजय शिंदे
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

धुळे शहरात तक्रारीनंतर नेहरू चौक परिसरात दुपारी सव्वातीनला 50 हजारांची रोकड आणि 'मेड इन चायना' लिहिलेली पिस्तूल सापडली.

धुळे : धुळे शहरात तक्रारीनंतर नेहरू चौक परिसरात दुपारी सव्वातीनला 50 हजारांची रोकड आणि 'मेड इन चायना' लिहिलेली पिस्तूल सापडली. पोलिसांनी गतीने तपास सुरू केल्यानंतर ती पिस्तूल नव्हे तर "गॅस लायटर' असल्याचे समोर आले. तोपर्यंत शहरात पैसे वाटप आणि पिस्तूल सापडल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात तथ्य नसल्याचा प्राथमिक दावा देवपूर पोलिसांनी केला.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि दोन अपक्ष उमेदवारांमध्ये काटा लढत होत आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. असे असताना देवपूरमधील नेहरू चौक परिसरातील मेडिकल दुकानाजवळ दुपारी सव्वातीनला पैसे वाटप होत असल्याची एका कार्यकर्त्याकडून तक्रार झाली. त्यावरून देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिस्तूल व 50 हजाराची रोकड, काही आधारकार्ड, रेशनकार्ड ताब्यात घेतले.

तपासानंतर पोलिसांना पिस्तूल नव्हे तर गॅस लायटर असल्याचे निष्पन्न झाले. तसेच 50 हजारांची रोकड कामकाजातील भाग होती, असे सिद्ध करून दाखविण्याचा प्रयत्न संबंधित दोघांकडून सुरू होता. भरारी पथकाकडून दुपारी सव्वाचारनंतरही चौकशी सुरू होती. या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. तसेच कुणालाही ताब्यात घेतलेले नव्हते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 Thousand and Gas Lighter Found in Dhule