सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ५६.५२ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सटाणा - सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल मंगळवार (ता.२९) रोजी ५६.५२ टक्के इतके मतदान झाले. सर्वाधिक मतदान कंधाणे गणात ६५.४ टक्के इतके तर तर सर्वात कमी मतदान आराई गणात २६.८ टक्के इतके झाले आहे. नेहमीप्रमाणे व्यापारी गटात ९९.३ टक्के तर हमाल - मापारी गटात ९८.३ टक्के मतदान झाले. किरकोळ बाचाबाची वगळता सर्वच मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. मतदानाची टक्केवारी घसरल्याने भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून विजयाचे गणित बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सटाणा - सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल मंगळवार (ता.२९) रोजी ५६.५२ टक्के इतके मतदान झाले. सर्वाधिक मतदान कंधाणे गणात ६५.४ टक्के इतके तर तर सर्वात कमी मतदान आराई गणात २६.८ टक्के इतके झाले आहे. नेहमीप्रमाणे व्यापारी गटात ९९.३ टक्के तर हमाल - मापारी गटात ९८.३ टक्के मतदान झाले. किरकोळ बाचाबाची वगळता सर्वच मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. मतदानाची टक्केवारी घसरल्याने भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून विजयाचे गणित बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गुरुवार (ता.३१) रोजी तहसील आवारातील मुख्य प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. एकूण नऊ टेबल्सवर मतमोजणीस प्रारंभ होणार असून दुपारी बारा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. 

सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाल्यानंतर दहा वाजेपर्यंत मतदारांमध्ये निरुत्साह दिसत होता. सर्वच मतदान केंद्रांवर शुकशुकाट जाणवत होता. दहा वाजेनंतर मतदानाने वेग घेतला. उन्हाचा तडाखा तीव्र झाल्याने मतदार घराबाहेर न पडल्याने पुन्हा दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान मतदान रोडावले. दुपारनंतरही मतदानाचा वेग न वाढल्याने एकूणच मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेअखेर एकूण ५६.५२ टक्के मतदानाची नोंद झाली. नवीन शासन नियमाप्रमाणे जिल्ह्यात बाजार समितीची हि पहिलीच निवडणूक असल्याने व थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याने मतदानाची टक्केवारी ८० टक्क्यांपर्यंत जाईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज फोल ठरला. डांगसौंदाणे, सटाणा, कंधाणे, तळवाडे दिगर, वायगाव, सुराणे, मुंजवाड येथे आज दिवसभरात किरकोळ शाब्दिक बाचाबाचीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. 

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून १३ जागांसाठी ४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सटाणा येथील मतदान केंद्रावर सरासरी ३१ टक्के मतदान झाले. सटाणा गणाच्या मतदान केंद्रावर सोसायटी गटासह व्यापारी व हमाल - मापारी गटाचेही मतदान असल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांपेक्षा उमेदवारांच्या समर्थक व कार्यकर्त्यांचीच गर्दी उसळली होती. बागलाण तालुक्यातील सुराणे, वटार, मळगाव आदी मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या समर्थकांनी बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी केल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तात्काळ भरारी पथक रवाना केले होते. मात्र बोगस मतदानाची निव्वळ अफवा असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे तणाव निवळला.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गणनिहाय मतदान केंद्रांवर झालेले एकूण मतदान पुढीलप्रमाणे :

  • कंधाणे (६५.४ टक्के) : विंचुरे (५७३), जोरण (२३९), वटार (३६७), चौंधाणे (४६७), कंधाणे (६२९).
  • चौगाव (५६.१ टक्के) : मुळाणे (५३३), कौतीकपाडे (४८६), भाक्षी (६२१), चौगाव (८४६).
  • आराई (२६.८ टक्के) : जुनी शेमळी (१५५), नवी शेमळी (१०४), आराई (६३१).
  • खमताणे (५५.६ टक्के) : जुने व नवे निरपूर (३६३), तिळवण (८०७), नवेगाव व वाडीचौल्हेर (२१५), खमताणे (६१५).
  • सटाणा (६०.२ टक्के) : मोरेनगर (१५४), सटाणा (१२४४).
  • डांगसौंदाणे (५६.६ टक्के) : कपालेश्वर (११६), चापा पाडा (१५४), निकवेल (२७५), डांगसौंदाणे (६४६), बुंधाटे (४१०), दहिंदुले (४२८).
  • तळवाडे दिगर (६१.३ टक्के) : जाखोड (१४६), भवाडे (११५), दसाने (२२२), केरसाने (४६१), तळवाडे दिगर (४९७), किकवारी खुर्द (४४१), किकवारी बुद्रुक (३७८).
  • वायगाव (६१ टक्के) : रातीर (३८०), रामतीर (३१४), कर्ऱ्हे (५४९), वायगाव (६१२), सुराणे (४२९).
  • मुंजवाड (५९ टक्के) : वनोली (७२३), तरसाळी (४१८), मुंजवाड (६०६), औंदाणे (३२४), मळगाव (१५३).
  • अजमेर सौंदाणे (६१.१ टक्के) : देवळाणे (९०१), अजमेर सौंदाणे (१७००).
Web Title: 56.52 percent polling for the Satana Agricultural Market Committee