नाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक

खंडु मोरे
रविवार, 9 डिसेंबर 2018

बँकेचा ओटीपी व एटीएमकार्डवरील नंबर मिळवून पैशांची फसवणूक केली जाते़. ग्राहकांनी अशा कोणतेही फोनकॉल्सला बळी पडू नये. ऑनलाईन खरेदी करताना संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासूनच व्यवहार करावा. सोशल माध्यमाचा काळजीपूर्वक वापर करावा.

- निलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण सायबर सेल.

खामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे़. नाशिक जिल्ह्यातील ४० व शहरी भागातील ३ पोलिस स्थानकातील सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणूक झालेल्या ६४ गुन्ह्यातील चार तक्रारदारांना ९५ लाख ४५ हजार रुपये परत मिळाले आहेत.

सायबर सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत सायबर सेल विभाग कार्यरत आहे. या विभागात सायबर गुन्ह्यांबाबत तक्रारी घेतल्या जातात. मागील वर्षभरात जिल्ह्यात ६४ गुन्हे घडले. बँक फसवणूक, सोशल माध्यमातून फेसबुक,व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुण-तरुणीना अश्लील, बदनामीकारक लिखाण, ठकबाजी, विनयभंग यांसारखे गुन्हे घडले.

सर्वाधिक गुन्हे बँक फसवणुकीचे झाले आहेत. यामध्ये बँक फसवणुकीत सामान्य ग्राहकांना बँकेसंबंधी सर्व माहिती घेतात. अगदी खाते क्रमांकही सांगितला जातो़. त्यामुळे बहुतांशी जणांचा यावर विश्वास बसून हा कॉल बँकेमधून आला आहे, असा समज होतो़. तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावयाचे आहे़.एटीएम कार्ड अपडेटस् करावयाचे आहे.तुम्हाला लोन मंजूर झाले.आदी कारणे सांगून सदर ग्राहकांकडून त्याचा एटीएम क्रमांक, ओटीपी विचारून घेतला जातो़.

त्याचबरोबर स्वस्तात वस्तू खरेदीचे आमिष,इंटरनेटवरील विविध संकेतस्थळावर तसेच व्हाटसअॅजप व फेसबुकवर ब्रॅण्डेड वस्तू स्वस्तात खरेदी करतायेत असल्याच्या ऑफर्स दिल्या जातात़.या ऑफरवर क्लिक केल्यानंतर ऑर्डर बुक केली जाते़.त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करावे लागते़.हे पेमेंट अदा करताना सदर साईटवर आपला एटीएम कार्डवरील क्रमांक व ओटीपी टाकावा लागतो़.हा ओटीपी सायबर गुन्हेगार नोट करून घेतात़ त्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातून गुन्हेगार त्यांच्या वॉलेटवर रक्कम वर्ग करून मोठ्याप्रमाणावर फसवणूक करतात.

बँक खातेदार ग्राहकांचा डेटा मिळवत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येत आहेत.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलिस स्थानकातील बँक खातेदाराला ४७ लाख त्याचबरोबर दुसऱ्या खातेदारास ४५ लाख २५ हजार व चांदवड तालुक्यात २ लाख ७५ हजारांची फसवणूक झालेली होती. जिल्ह्यातील मोठ्या तिघेही गुन्ह्यात तक्रारदाराना रकमेचा परतावा मिळवून देण्यात यश आले आहे. दहा ते अकरा महिन्यांत जिल्ह्यात फसवूणक झालेल्या चार तक्रारदारांना सायबर सेलच्या माध्यमातून ९५ लाख ४५ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत़.
जिल्ह्यातील एकूण गुन्हे-६४
उघडकीस आलेले गुन्हे-३
तपासावर-२४
फेसबुक संदर्भातील-६
माहिती तंत्रज्ञान कायद्याखालील-१२
विनयभंग-८
इतर-४
भाग पाच-१
ठकबाजी-१
एटीएम-५

सोशल माध्यमातील मानहानिकार लिखाण,बँक फसवणूक संदर्भात फसवणूक झाल्याबरोबर तक्रारदारांनी सायबर सेल पोलिसांशी संपर्क साधावा. बँकेशी निगडित कुठलाही पासवर्ड,खातेनंबर अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर करू नये.

- एस.एस.अनमोलवार, पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे नाशिक.

Web Title: 64 cheating online frauds in Nashik this year