84 व्या वर्षी माजी आमदार सपत्नीक करताहेत शेती

मंगेश शिंदे
शनिवार, 14 जुलै 2018

माजी आमदार विठ्ठलराव घारे (वय 84) यांची ही गौरवगाथा, आजच्या तरुणाईच्या आणि खासकरून राजकीय परिस्थितीच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. घारे 1972 ते 1983 अशी तब्बल अकरा वर्षे कॉंग्रेसचे आमदार होते. तरीदेखील कुठलाही बडेजाव न मिरवता आजही ते अगदी सर्वसामान्य शेतकऱ्याचे जीवन जगत आहेत.

काळुस्ते (नाशिक) : लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच असो किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा सदस्य, निवड होताच प्रशस्त बंगला, चारचाकी गाडी यांसारख्या सोयी-सुविधा रातोरात त्यांच्या दिमतीला सिद्ध होतात. अशा पार्श्‍वभूमीवर तब्बल अकरा वर्षे विधिमंडळात इगतपुरी तालुक्‍याचे प्रतिनिधित्व करणारे एक जुन्या पिढीतील कॉंग्रेसचे माजी आमदार आजही सर्वसामान्य शेतकऱ्याप्रमाणे शेतात राबताहेत.

माजी आमदार विठ्ठलराव घारे (वय 84) यांची ही गौरवगाथा, आजच्या तरुणाईच्या आणि खासकरून राजकीय परिस्थितीच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. घारे 1972 ते 1983 अशी तब्बल अकरा वर्षे कॉंग्रेसचे आमदार होते. तरीदेखील कुठलाही बडेजाव न मिरवता आजही ते अगदी सर्वसामान्य शेतकऱ्याचे जीवन जगत आहेत. आमदारकीची मिळणारी पेन्शन आणि शेती या मुख्य व्यवसायावरच ते समाधानी आहेत. किंबहुना आर्थिक परिस्थिती बेताचीच असूनही, तालुक्‍यातील जनतेच्या मनात आजही त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर कायम आहे. विशेष म्हणजे त्यांचे पुत्र घोटी शहरात वास्तव्यास असूनही ते एक दिवसही त्यांच्याकडे मुक्कामी थांबत नाहीत. त्यातून स्वाभिमान, गावाची ओढ आणि शेतीवर असलेले विशेष प्रेम याचा आदर्शच जणू ते घालून देत आहेत. प्लास्टरही नसलेल्या जुन्या घरातच राहून जवळच असलेल्या शेतात ते आजही मजुरांबरोबर न थकता मोठ्या उत्साहाने राबताना दिसतात. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडे गावातील किंवा बाहेरील कोणीही लहान-मोठी व्यक्ती आपुलकीने भेटायला, विचारपूस करायला गेल्यास ते चहापाणी व जेवण केल्याशिवाय परत जाऊ देत नाहीत.

तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात यंदा चांगला पाऊस होत आहे. काळुस्ते येथे नव्यानेच बांधण्यात आलेले भाम धरण जवळपास 45 टक्के भरले आहे. त्यामुळे परिसरात भातलागवडीच्या कामाला चांगला वेग आला असून, पंचक्रोशीतील शेतकरी भात लावणीच्या कामात मग्न आहेत. त्यांच्यापैकीच एक म्हणजे स्वत: माजी आमदार घारेदेखील आवणीच्या कामात मग्न असल्याचे बघायला मिळते.

विधानसभा सदस्य म्हणून मी तब्बल 11 वर्षे तालुक्‍याचे नेतृत्व केले आहे. मात्र, आजही मी साधारण राहणीमान आणि सामान्य शेतकऱ्याचेच जीवन जगत आहे. वयाच्या 84 व्या वर्षीदेखील शेतामध्ये काम करण्याची आवड आजपर्यंत जोपासली आहे. आजही मी सकाळी लवकर उठून सातलाच शेतात जाऊन काम करून घेतो व स्वत:ही मदत करतो.
- विठ्ठलराव गणपत घारे, माजी आमदार

Web Title: 84 years old MLA farming with wife