जनतेने संचारबंदीचे पालन करावे :ऍड.के.सी.पाडवी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

नागरिकांना केलेल्या आवाहनात पालकमंत्री म्हणतात, जिल्ह्यात 31 मार्च 2020 पर्यंत मनाई आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व सीमा येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. कोणत्याही खाजगी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी केवळ वैद्यकीय कारणासाठी किंवा जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडावे आणि अशा ठिकाणीदेखील गर्दी करू नये. 
 
नंदुरबार, : करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा केली आहे. जिल्ह्याच्या सीमादेखील प्रशासनाने बंद केल्या आहेत. करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे व घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी केले. 

नागरिकांना केलेल्या आवाहनात पालकमंत्री म्हणतात, जिल्ह्यात 31 मार्च 2020 पर्यंत मनाई आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व सीमा येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. कोणत्याही खाजगी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी केवळ वैद्यकीय कारणासाठी किंवा जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडावे आणि अशा ठिकाणीदेखील गर्दी करू नये. 
गरजेपेक्षा जास्त वस्तूंची खरेदी करू नये. बाहेर पडल्यानंतरही नागरिकांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊ नये. धार्मिक स्थळांच्या ठिकाणीदेखील गर्दी करू नये. पुढील 7 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. आपण घराबाहेर जाणे टाळले तर कोरोना विषाणूची साखळी तोडता येईल आणि जिल्हा कोरोनामुक्त ठेवता येईल. 
बाहेरील देशातून किंवा पुणे-मुंबई येथून आलेल्या प्रवाशांची माहिती प्रशासनास द्यावी व डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला घरात किंवा रुग्णालयात क्वॉरंटाईन करून घ्यावे. व्यक्तीशी संपर्क करताना दोन मीटरचे अंतर ठेवावे. आजाराची लक्षणे दिसताच आरोग्य तपासणी करून घ्यावी. हा आजार विलगीकरणात राहिल्यास बरा होत असल्याने घाबरून न जाता आपल्या आरोग्यासाठी आवश्‍यक खबरदारी घ्यावी. प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांची सुरक्षा अत्यंत महत्वाची असल्याने योग्य खबरदारी घ्यावी. 
नंदुरबारची जनता कोरोना विरुद्धच्या या लढ्यात यशस्वी होईल आणि जिल्हा करोनामुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीदेखील आपत्कालीन परिस्थितीत शासन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ad padvi says publiq must in home at casfue