विंचूर चौफुलीच्या नामकरणाबाबत ठिय्या आंदोलन सुरुच

सकाळ वृतसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

- विंचूर चौफुली परिसर राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने परिचीत आहे.

- तरीही पालिकेने आंबेडकरी चळवळीला अंधारात ठेऊन चौकाला इतर नाव देण्याचा ठराव करुन आंबेडकरी जनतेची दिशाभूल केली आहे.

- हा ठराव त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी आज आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पलिकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

येवला : येथील वर्दळीच्या विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व तांच्या नावाने शॉपिंग सेंटर असून परिसर राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने परिचीत आहे. तरीही पालिकेने आंबेडकरी चळवळीला अंधारात ठेऊन चौकाला इतर नाव देण्याचा ठराव करुन आंबेडकरी जनतेची दिशाभूल केली आहे. हा ठराव त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी आज आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पलिकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आज दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच आहे.

जो परिसर डॉ.आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जातो त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हेच नाव असायला पाहिजे. मात्र पालिकेने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देऊन आमची दिशाभूल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंबेडकरी विचारधारेचे लोक वाजपेयीचा आदर करतात. शहरातील अन्य दुसर्‍या चौकाला वाजपेयी यांचे नाव देण्याची आमची मागणी आहे. पालिकेने आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता हा निर्णय घेतल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. याचमुळे आंबेडकरी विचार धारेचे तालुक्यातील जाणकार कार्यकर्ते व समाज बांधवानी आज सकाळपासूनच नागरपालिकेसमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.

दरम्यान आज दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,राष्ट्रवादीचे गटनेते संकेत शिंदे,मुख्याधिकारी संगीता नांदुरकर आदींनी भेट देऊन चर्चा केली व सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र ठराव रद्दचा निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकानी घेतला असल्याने यावर ठोस निर्णय झाला नाही. आंदोलनात भाऊसाहेब अहिरे, महेंद्र पगारे आदींसह समाज बांधव सहभागी झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agitation on the naming of Vincur Chaufuli ongoing