#MondayMotivation अमृताच्या भरारीला नेटकऱ्यांची दाद!

amruta pimplewadkar.jpg
amruta pimplewadkar.jpg

नाशिक : दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर वाढत असून फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉट्‌सअप हे तरुणांबरोबरच लहानांपासूनच मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच आवडीचे झाले आहेत. एकीकडे सोशल मिडीयाला व्यसन म्हणून पाहिले जात असतांना, या माध्यमाचा प्रभावी वापर करत नाशिकच्या अमृता पिंपळवाडकर या युवतीने आपल्या हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. नेटकरी तिच्या आवाहनाला प्रतिसाद देत वस्तुंची खरेदीदेखील करत आहेत. 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली परिस्थितीवर मात
टिळक रोड येथील अमृता दिलीप पिंपळवाडकर ही सध्या विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शालेय जीवनापासूनच शिक्षणासाठी पैशांची चणचण जाणवत होती. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्या वाढदिवसाला भेट देण्याची अमृताला आवड होतीच. पुरेसे पैसे नसल्यामुळे अमृता त्या भेटवस्तू घरीच बनवायची. त्याचबरोबर, पैशांची गरज भागविण्यासाठी अमृताने अवघ्या पंधराव्या वर्षापासून हॅण्डमेड वस्तू बनवून त्याची विक्री सुरु केली. गेल्या पाच वर्षांपासून अमृता सोशल मीडियाच्या व्यासपीठाचा वापर करुन उत्तम व्यवसाय करत आहे. इयत्ता दहावी ते एम.एस्सी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी या व्यवसायाचा तिला खूप फायदा झाल्याचे अमृता सांगते. तिचे वडील चालक तर आई गृहिणी असल्यामुळे स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी अमृतावर होती. शिक्षणामुळे अमृताला नोकरी करणे शक्‍य नसल्यामुळे तिने घरच्या घरी आवडीतून व्यवसाय करण्याचे ठरवले. व्यवायासाच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडियाला वाव असल्यामुळे अमृताने फेसबुक व इंन्टाग्रामच्या माध्यमातून मार्केटिंग करुन वस्तूची विक्री सुरु केली. सुरुवातीला काही प्रमाणात विक्री व्हायची. कालांतराने महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशात देखील अमृताने बनविलेल्या वस्तू खरेदी केल्या जात आहे. 

या वस्तूंची होतेय जोरदार खरेदी 
रेशीम धाग्यांचे दागिने, बाटली किचेन, मॅक्रॉन बॅग, कॅमेरा कार्ड, नाव स्क्रॅपबुक, अनंत बॉक्‍स यासह विविध आकर्षक वस्तूंना ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. वाढती मागणी लक्षात घेता आई व मैत्रिणीदेखील कामात तिला मदत करू लागल्या आहेत. सोशल मिडीयामुळे यशस्वी व्यावसायिक होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकल्याचे मत अमृता व्यक्‍त करते. सोशल मीडियाचा काळजीपूर्वक व योग्य वापर केल्यास नक्कीच ते एक उत्तम माध्यम असल्याचेही ती आवर्जुन सांगते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com