ध्येयवेड्या अनिलचे 'ते' स्वप्न झाले साकार !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नैताळे : श्रीरामनगर (ता. निफाड) येथील शेतीत मोलमजुरी करणाऱ्या निकम कुटुंबातील मुलगा अनिल याला जपानमधील टोकियो येथील रॅक्‍यूटेन कंपनीने नोकरी दिली आहे. त्यासाठी कंपनीने ५४ लाख ८० हजार रुपयांचे पॅकेज देऊ केले आहे. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाचा मुलगा जपानला जाणार असल्याने अनिलच्या परिवारातील सदस्य, ग्रामस्थांना आनंद तर झाला आहेच, सोबतच इतर तरुणांना देखील प्रेरणा मिळत आहे.

अण्णासाहेब बोरगुडे : सकाळ वृत्तसेवा
नैताळे : निफाडपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील श्रीरामनगर येथे राजाराम निकम यांचे छोटेशे शेतकरी कुटुंब. अवघी २६ आर जमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर होणे शक्‍य नसल्याने राजाराम व त्यांची पत्नी मजुरीने शेतीकामे करतात. त्यांचा मुलगा अनिल याने प्राथमिक शिक्षणानंतर, नातेवाइकांच्या घरी राहून एम.टेक.पर्यंत शिक्षण घेऊन सॉफ्टवेअर इंजिनिअरची पदवी घेतली.

शिक्षण, चिकाटी व मेहनतीमुळे मिळाली संधी

त्याच्या शिक्षण, चिकाटी व मेहनतीमुळे जपान देशातील टोकियो येथील रॅक्‍यूटेन कंपनीने त्याला चक्क नोकरीची संधी दिली आहे. त्यासाठी कंपनी त्याला ५४ लाख ८० हजारांचे पॅकेज देणार आहे. तसा करार होऊन अनिल निकम याने करारावर सही केली आहे. कंपनी त्यांना ऑक्‍टोबर २०२० ला सेवेत रुजू करून घेणार आहे. यामुळे श्रीरामनगर येथील ग्रामस्थांना आनंद झाला आहे. निकम कुटुंबाने पेढे वाटून आपल्या आनंदात ग्रामस्थांना सहभागी करून घेतले. निकम कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून, राहण्यासाठी घर नव्हते, म्हणून शासनाचे घरकुल मिळाले. अतिशय कष्टमय जीवन जगत असताना मुलाने उच्च शिक्षण घेऊन नाव रोशन केल्याने पती-पत्नीला आनंदअश्रू अनावर झाले होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil nikam got job in japan with great package