चारा पाणी नसल्याने जनावरे विकली 

योगेश महाजन
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

अमळनेर : गेल्या चार वर्षापासून दुष्काळी स्थिती आहे. उत्पन्नात मोठी घट झाल्याने घेतलेले कर्ज आम्ही फेडू शकत नाहीत. चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने जनावरे विकावी लागत आहे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीसमोर मांडल्या. 

अमळनेर : गेल्या चार वर्षापासून दुष्काळी स्थिती आहे. उत्पन्नात मोठी घट झाल्याने घेतलेले कर्ज आम्ही फेडू शकत नाहीत. चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने जनावरे विकावी लागत आहे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीसमोर मांडल्या. 

जुनोने (ता. अमळनेर) येथे केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीने सकाळी अकराच्या सुमारास भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. केंद्रीय जलआयोगाचे संचालक आर. डी. देशपांडे, सहसचिव श्रीमती छवी छा, डिपार्मेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए. के. तिवारी, एमएनसीएफसीच्या सहायक संचालिका डॉ. शालिनी सक्‍सेना, नाशिक विभागीय आयुक्‍त एकनाथ डवले, राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर आदी उपस्थित होते. 

सहाशे जनावरांची विक्री 
यावेळी शेतकरी रमेश अमृत पाटील व निंबा नथ्थू धनगर यांच्या शेतात समितीच्या सदस्यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली. चारा उपलब्ध नसल्याने बाहेरून चारा मागवावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जेथे चारा व पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी जनावरांची सोय करावी लागत आहे. काही जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. सुमारे 599 जनावरे आतापर्यंत विकली गेली आहेत. 

पाण्यासाठी विहीर अधिग्रहीत 
गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बिलखेडा (ता. धरणगाव) येथील विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे. जोपर्यंत विहिरीत पाणीसाठा उपलब्ध आहे, तोपर्यंतच गावाची तहान भागणार आहे. त्यानंतर पुन्हा पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार असून, टॅंकरने पाणीपुरवठ्याची आवश्‍यकता भासणार आहे. यासाठी वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे. भर पावसाळ्यात पाच ते सात गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. सद्यःस्थितीत 88 ते 90 गावे ही टॅंकरने तहान भागवत आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी समितीला दिली. 

रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर 
दुष्काळाने बेरोजगारीचीही कुऱ्हाड कोसळली आहे. परिसरात रोजगार नसल्याने मजुरीची वेळ आली असून, सुमारे 22 कुटुंब परराज्यात स्थलांतरित झाले आहेत. सुमारे दीडशे ग्रामस्थ कामासाठी गुजरात राज्यात गेले आहेत. पंधरा ते वीस कुटुंब ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यात मजुरीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे गाव ओसाड पडले असून, शासनाने गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजनांची मागणीही शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी यावेळी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animals sale because no water and cattle food