Agniveer Bharti | ‘अग्निवीर’साठी नोंदणी करा : जिल्हाधिकारी शर्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Jalaj Sharma

Agniveer Bharti | ‘अग्निवीर’साठी नोंदणी करा : जिल्हाधिकारी शर्मा

धुळे : भारतीय सैन्य भरती (अग्निवीर एन्ट्री) २०२३-२४ साठी पात्र पुरुष (Male) उमेदवारांसाठी आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, मुंबई यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. (Army Recruiting Office Mumbai released notification for eligible male candidates for Indian Army Recruitment dhule news)

ही अधिसूचना www.joinindianarmy.nic या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून, ऑनलाइन नोंदणी १५ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती संचालक (भरती) कर्नल विक्रम सिंग यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

भरती वर्ष २०२३-२४ साठी अग्निवीरांची भरती दोन टप्प्यांत केली जाणार आहे. टप्पा एक (ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा) आणि दुसरा टप्पा (भरती रॅली) याप्रमाणे राहील. अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल,

अग्निवीर ट्रेड्समन (दहावी पास) आणि अग्निवीर ट्रेड्समन (आठवी पास) या पदांसाठी भरती आयोजित केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि धुळे या आठ जिल्ह्यांचे रहिवासी (अधिवास) असलेल्या उमेदवारांसाठी होणार आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

उमेदवारांना भारतीय लष्कराच्या वेबसाइटवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. जे उमेदवार यशस्वीरीत्या ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करतील त्यांची प्रवेशपत्रे त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविली जाणार आहेत.

ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा (ऑनलाइन CEE) महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसार घेतली जाईल. १७ एप्रिलपासून ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. गुणवत्तायादी मे २०२३ मध्ये संकेतस्थळावर घोषित केली जाईल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना नियुक्त केलेल्या वेळेत आणि ठिकाणी भरती मेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येईल.

याबाबतचा तपशील ‘रॅली अॅडमिट कार्ड’ (नंतर जारी केला जाईल)वर देण्यात येईल. शारीरिक चाचण्या आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर अंतिम गुणवत्तेत निवडलेल्या उमेदवारांना राष्ट्रसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी बोलावले जाईल. धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे.