पंचायत समिती सभापती को..गुस्सा क्‍यो आता है!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

शिरसोली गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने अपघात नको म्हणून, चालक जयवंत पाटलांनी बस थांब्यावर बस न थांबवता थोडं पुढे नेण्याचा प्रयत्न करताच दुचाकीस्वाराने प्रचंड वेगात दुचाकी आणून या बस समोर आडवी लावत चालकांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. बसमधील सर्व प्रवासी हा घटनाक्रम बघत होते, एक-दोघांनी चालकाची बाजू धरली मात्र, समोरची व्यक्ती राजकीय रुबाबाची असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते.

जळगाव:- बांबरुड(ता.पाचोरा)-जळगाव बस शिरसोली मार्गे येत असताना शिरसोली गावात मुख्य रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने चालकाने बसस्टॉप सोडून बस पुढे नेल्यावर बस अडवून चालकाला दुचाकीस्वाराने शिवीगाळ केली. प्रवासी घेऊन परत बस रवाना झाल्यावर दोन किलोमीटर नंतर पुन्हा बस समोर दुचाकी आडवी लावून अपंग प्रवाशाला घेऊन जायचे होते असा आव आणून पुन्हा चालकाला शिवीगाळ करून आपण पंचायत समिती सभापती असल्याचा रुबाब दाखवला. चालकाने बस पोलिस ठाण्यात आणल्यावर मात्र, आमदार-खासदारांसह  मंत्र्यांनी दबाव आणल्याने किरकोळ नोंद घेऊन प्रकरण मिटविण्यात आल्याचा प्रकार घडला. या सर्व घटनेत मात्र बस मधील 84 प्रवाशांना तीन तास ताटकळत राहावे लागले. 

जळगाव आगाराची बस क्र. (एमएच.20.बी.एल. 951) ही पाचोरा तालुक्‍यातील बांबरुड येथून शिरसोली मार्गे जळगाव येत होती. शिरसोली गावात मुख्य रस्त्याचे डांबरीकरण सुरू असल्याने मोठ्या वाहन धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, त्यात महामंडळाच्या बस चालकांना नेहमीच अपघाताची भीती लागून असते. बस चालक जयवंत भागवत पाटील वाहक अजय गणपत पाटील असे दोघेही बांबरुड हुन जळगावच्या दिशेने येत असताना या बस मध्ये तब्बल 84 प्रवासी विद्यार्थी-महिला प्रवास करीत होते. शिरसोली गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने अपघात नको म्हणून, चालक जयवंत पाटलांनी बस थांब्यावर बस न थांबवता थोडं पुढे नेण्याचा प्रयत्न करताच दुचाकीस्वाराने प्रचंड वेगात दुचाकी आणून या बस समोर आडवी लावत चालकांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. बसमधील सर्व प्रवासी हा घटनाक्रम बघत होते, एक-दोघांनी चालकाची बाजू धरली मात्र, समोरची व्यक्ती राजकीय रुबाबाची असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. चालकाने नमतं घेऊन शिरसोलीचे प्रवासी बसवून बस काढली. बस दोन किलोमीटर पुढे आली असताना दुचाकीवर एका अपंगाला बसवून याच महाशयांनी पुन्हा बस अडवून चालकाला नव्याने शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरवात केली. मी, कोण आहे, तू ओळखत नाही..का? तुला दाखवून देईल, नोकरी खाऊन जाईल अशा धमक्‍यांसह अश्‍लाघ्य शिवीगाळ करून तासभर बस अडवून धरली. चालकाने वाद न घालता बस थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणली. चालकाने पोलिस ठाण्यात या महाशयांनी तक्रार दिल्यानंतर मात्र, राजकीय चक्रे वेगवान होऊन पोलिस ठाण्याचा फोन..खणखणु लागला. 

सभापतींचा अदखलपात्र..गुन्हा 
एरवी..शाळकरी पोरांनी जरी बस अडवून चालकाला दमदाटी केली, तर शासकीय कामांत अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला जातो. बस वाहक-चालक संघटना काम बंद आंदोलन छेडून आपला रोष व्यक्त करते. मात्र, थेट मंत्र्यांनीच फोन केल्यावर..बस अडवून शिवीगाळ करणारी व्यक्तीच पोलिस निरीक्षकांच्या दालनात शिरल्यावर शासकीय कामांत अडथळा, शासकीय नोकरास धमकावले, शिवीगाळ करणे या कलमांना फाटा देत थेट अदखलपात्र गुन्ह्यावर फिर्याद पोचली. चालक जयवंत भागवत पाटील यांच्या तक्रारीवरून पंचायत समितीचे सभापती नंदू पाटील यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली. 

प्रवासी ताटकळले 
शासकीय कामांत अडथळा करून बस मधील प्रवाशांना वेठीस धरलेल्या व्यक्तीमुळे बांबरुड, पाचोरा येथील महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय नोकर, वृद्ध महिला अशा एकूण 84 प्रवाशांना तब्बल तीन तास ताटकळत राहावे लागले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arogunt leader of jalgaon zp nandu patil