कृत्रिमरीत्या पिकविलेल्या फळांची बाजारात रेलचेल

खंडू मोरे ः सकाळ वृतसेवा
बुधवार, 10 मे 2017

ग्रामीण भागातील मालेगाव, देवळा, कळवण व सटाणा या भागातील बाजारपेठांतील घाऊक व्यापारी या रसायनाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अन्न व औषध प्रशासन या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने या विभागाविषयी ग्राहकांत नाराजी आहे

खामखेडा - अक्षयतृतीया आली, की आंब्यांचा सीझन सुरू होतो. सर्वत्र पिकलेल्या आंब्याला मागणी वाढते. अशा वेळी बाजारपेठेत आंब्यांच्या मागणीइतका पुरवठा होण्यासाठी विक्रेत्यांकडून ही फळे कृत्रिमरीत्या कार्बाईड या रासायनिक पदार्थाचा वापर करून पिकविली जातात. याकडे अन्न व औषध प्रशासनाने उघडपणे केलेल्या डोळेझाकमुळे विक्रेत्यांचे फावते. ग्राहकांना मात्र पैसे देऊन विषाची खरेदी करावी लागते. कृत्रिमरीत्या फळे पिकवणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

साधारणत: मार्चपासून आंबा बाजारात विक्रीसाठी दाखल होतो. आंब्याची दर वर्षी हजारो टन खरेदी- विक्री होते. काही उत्पादक आंबा पिकविण्यासाठी व बाजारात आंबा लवकर आणण्यासाठी कृत्रिमरीत्या पिकवतात. आंबा पिकवण्यासाठी व्यापाऱ्याकडून सर्रास कार्बाईड या रसायनाचा वापर होतो. अशा पद्धतीने पिकविलेले आंबे आरोग्यास हानिकारक असतात. त्यामुळे आंबा पिकवण्यासाठी हे रसायन वापरणे धोकादायक आहे. हापूस, केशर, तोतापुरी, लंगडा, बदाम, पायरी खोबरा, सुरती, लालबाग अशा आंब्यांच्या विविध जाती ग्रामीण भागातील बाजारात येतात. मात्र, हे आंबे पिकण्यासाठी जास्त कालावधी लागतो. हा आंबा लवकर पिकला जाऊन विकता यावा म्हणून व्यापारी रासायनिक पदार्थ टाकून पिकवतात. हे सर्व आंबे राज्याच्या विविध भागांतून, तसेच परराज्यांतून येतात. हा कच्चा आंबा लवकर पिकावा म्हणून विक्रीच्या घाईत असलेले व्यापारी मोठ्या प्रमाणावर कार्बाईडचा वापर करतात. यामुळे फळातील नैसर्गिक शक्ती कमी होते.

आंब्याबरोबरच केळी, चिक्‍कू ही फळेही अशीच पिकवली जातात. ही फळे रुग्ण, लहान मुले, वयोवृद्ध यांना सेवन करण्यास दिल्याने धोका वाढतो. ग्रामीण भागातील मालेगाव, देवळा, कळवण व सटाणा या भागातील बाजारपेठांतील घाऊक व्यापारी या रसायनाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अन्न व औषध प्रशासन या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने या विभागाविषयी ग्राहकांत नाराजी आहे.

बाजारपेठांतील घाऊक व्यापाऱ्यांच्या गुदामांवर छापे टाकावेत. रासायनिक प्रक्रिया करून फळांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी.
- सुभाष ठाकरे, ग्राहक, सटाणा

Web Title: Artificially farmed Fruits dominate Markets