Success Story : बळसाणेचा सुपुत्र झाला पहिला ‘RTO’; गुणवत्तायादीत 139 वा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rto

Success Story : बळसाणेचा सुपुत्र झाला पहिला ‘RTO’; गुणवत्तायादीत 139 वा

दुसाणे (जि . धुळे) : साक्री तालुक्यातून माळमाथा परिसरातील गावांमधून प्रथमतःच बळसाणे येथील स्वप्नील कैलास दाभाडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या ‘आरटीओ’च्या (RTO) परीक्षेतून महाराष्ट्रात गुणवत्तायादीत १३९ क्रमांकाने, (Balban son was 139th in the first RTO merit list dhule news)

तर अनुसूचित जमाती या संवर्गात चौथ्या क्रमांकाने यश संपादन करून आरटीओ होण्याचा मान पटकावला. स्वप्नीलचे बळसाणेसह माळमाथा परिसरातून व शिक्षक संघटनेमार्फत कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी व प्राथमिक शाळेत आखाडे येथे शिक्षकपदावर कार्यरत असलेले कैलास रतन दाभाडे यांचा मुलगा स्वप्नील दाभाडे याने जिद्द व कठोर परिश्रमाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन बळसाणे व परिसरातून पहिल्याच मुलाने आरटीओ होण्याचा मान मिळविला आहे. हे स्वप्नीलच्या अथक मेहनतीतून सिद्ध झाले आहे.

बळसाणे येथील (कै.) ए. एन. गिरासे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी देवाभाऊ दाभाडे यांचा तो पुतण्या आहे. त्याने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. स्वप्नीलने पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण निजामपूर (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण धुळे येथील नवोदय विद्यालयात घेतले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

डिप्लोमा जालना येथे आणि बीई पुणे येथील सिंहगड कॉलेजमध्ये केले आहे. महाविद्यालयीन अभ्यास करीत असतानाच त्याने रिकाम्या वेळेत लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आरटीओ व्हावे अशी जिद्द मनात बाळगली होती.

वडील कैलास दाभाडे प्राथमिक शिक्षक आणि राजेंद्र पाटील (जिल्हाध्यक्ष, धुळे), बापू पारधी तसेच समिती परिवाराचे स्वप्नीलला नियमितपणे मार्गदर्शन लाभत गेले. त्या मार्गदर्शनातून त्याने यश गाठले. आई सुवर्णा दाभाडे गृहिणी असून, हीमुलाला सुसंस्कार देत उच्च पदावर गेल्याचा आनंद व्यक्त केला आहे. स्वप्नीलने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर स्पर्धा परीक्षेतून यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"बळसाणेसह माळमाथा परिसरातील मुला-मुलींनी कठोर परिश्रम व इच्छाशक्ती ठेवल्यास कुठल्याही प्रकारची परीक्षा उत्तीर्ण होणे सहज शक्य आहे. बळसाणेसह परिसरातील मुला-मुलींनी खचून न जाता स्पर्धा परीक्षांमध्ये हिमतीने पुढे गेले पाहिजे." -स्वप्नील दाभाडे, बळसाणे

टॅग्स :Dhulertompsc