
BJP Booth Campaign: विधानसभेत दोनशे प्लस जागांचे लक्ष्य : विजय चौधरी
Dhule News : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही विधानसभा, लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी बूथ सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप दोनशे प्लस, तर लोकसभा निवडणुकीत ४५ प्लस जागा मिळवेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (BJP Booth Campaign Target of 200 plus seats in Legislative Assembly Vijay Chaudhary dhule news)
भाजपच्या बूथ सशक्तीकरण कार्यशाळेचे रविवारी येथे आयोजन झाले. या अनुषंगाने राम पॅलेस येथे श्री. चौधरी यांची पत्रकार परिषद झाली. खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील, भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.
श्री. चौधरी म्हणाले, की भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना सर्व जिल्हे पालथे घातले. ओबीसींचे संघटन वाढविले. त्यानंतर नंदुरबार जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. नुकतीच कसबा आणि पिंपरी-चिंचवड निवडणुकीचीही जबाबदारी माझ्याकडे होती.
आता पक्षांकडून प्रदेश महामंत्रिपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला राज्यभरात दौरा करून राजकीय, सामाजिक स्थितीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आपण राज्यभरात दौरे करत आहोत.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून बूथ सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत सर्व जिल्ह्यांत हे बूथ प्रशिक्षण पूर्ण केले जाईल.
५ मार्चपर्यंत मंडळ प्रशिक्षण पूर्ण होईल. आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ आणि विधानसभा निवडणुकीत २०० प्लस जागा जिंकण्याचे भाजपचे नियोजन असल्याचेही श्री. चौधरी म्हणाले.
नाशिक येथे पक्षप्रवेश सोहळा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारीला नाशिक येथे पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यात विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील.
यात नंदुरबार येथील जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, माजी नगराध्यक्ष बबन बाळी हेदेखील प्रवेश करतील. दरम्यान, शिवजयंतीच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचाही त्यांनी समाचार घेतला.