राज्यात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल: मुख्यमंत्री

निखिल सूर्यवंशी
Friday, 23 August 2019

आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल.

धुळे : राज्यातील नागरिकांचा कल भाजप युतीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी धुळ्यात मुक्कामानंतर त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत विरोधकांच्या यात्रांवर टीकाही केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'दहा जिल्ह्यात आणि 42 विधानसभा मतदारसंघात महाजनादेश यात्रा पोहोचली आहे. राज्यातील पुरस्थितीमुळे यात्रा स्थगित केली. तिचा दुसरा टप्पा धुळ्यातून सुरू केला. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात शेवटचा तिसरा टप्पा असेल. भाजपने ही यात्रा काढल्यानंतर अनेकांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा देतो. वास्तविक, भाजपची यात्रा काढण्याची परंपरा आहे. विरोधक असताना संघर्ष व सत्तेत असताना संवाद यात्रा काढली जाते. त्यास प्रतिसाद मिळतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यात्रेची काय स्थिती झाली हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कॉंग्रेसची भ्रष्टाचार यात्रा सुरू झाल्याने बंद पडली. मात्र, पाच वर्षांच्या राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून दिली जात आहे. देशात विविध क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या तीन क्रमांकामध्ये असल्याचे समाधान आहे.'

भाजपमध्ये प्रवेशासाठी "वेटिंग'वर असलेल्यांविषयी मुख्यमंत्र्यांनी सांगितले, 'विरोधकांनी भाजपच्या मेगा भरतीऐवजी त्यांच्यातील मेगा गळतीचा विचार करावा. प्रवेशाबाबत भाजपने "फिल्टर पॉलिसी' अवलंबली आहे. विधानसभा निवडणुकीत मर्यादित जागा असल्याने सर्वांना उमेदवारी देऊ शकत नाही. यात भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या माजी अधिकाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेचे मिळणारे प्रेम पाहता माझी जबाबदारी वाढणार आहे. मोदींच्या नेतृत्वात पुन्हा राज्यात भाजप युतीचे सरकार आणून अधिक काम करू, राज्य दुष्काळमुक्त करू.'

जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, यात्रेचे प्रमुख भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंग ठाकूर, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेसह अमळनेरकडे (जि. जळगाव) रवाना झाले. दरम्यान, धुळे हद्दीतील महामार्गावर भाजपच्या डॉ. माधुरी बोरसे यांनी चांदीचे कमळ देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will get full majority in Assembly election at state says devendra fadnavis