Dhule Crime News : नाशिकच्या वीटभट्टीचालकाला दीड लाखाला लुटले! 7 संशयितांविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Dhule Crime News : नाशिकच्या वीटभट्टीचालकाला दीड लाखाला लुटले! 7 संशयितांविरोधात गुन्हा दाखल

शिरपूर (जि. धुळे) : शरीराचे तुकडे करून जंगलात फेकून देऊ, अशी धमकी देऊन नाशिक जिल्ह्यातील वीटभट्टीचालकाकडून एक लाख ६० हजार रुपयांची रोकड काढून घेण्यात आली. ही घटना १० जानेवारीला दुपारी खंबाळे (ता. शिरपूर) येथे घडली. सात संशयितांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Brick kiln driver of Nashik robbed of one half lakh case registered against 7 suspects Dhule Crime News)

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात सावळी येथे अरुण बाबूराव बोडके (वय ५४) यांची वीटभट्टी आहे. तेथे कामगारांची गरज असल्यामुळे ते मजुरांचा शोध घेत होते. दरम्यान, २ जानेवारीला दहिवद (ता. शिरपूर) येथील पिंटू रतन नामक व्यक्तीशी त्यांनी संपर्क साधला.

त्याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अरुण बोडके, त्यांचा मुलगा आकाश बोडके व चुलतभाऊ जगन बोडके १० जानेवारीला बोलेरो जीपने शिरपूरला येऊन पोचले. चोपडा फाटा येथे त्यांची भेट घेऊन पिंटू रतन याने मजूर खंबाळे येथे असल्याचे सांगितले.

त्याला सोबत घेऊन ते खंबाळे येथे गेले. तेथे सचिन चरणसिंह पावरा, दिनेश मूलचंद पावरा व अन्य एकाला बोलावून घेत ते मजुरांचे मुकादम आहेत, अशी ओळख पिंटू रतन याने करून दिली. त्यांच्याकडे पाच ते सहा मजूर दांपत्ये असून, त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपये आताच द्या, अशी मागणी संशयितांनी केली.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू...

हेही वाचा: शाकंभरी यात्रेत Indian Chocolateला पसंती! मंदाणेत यात्रेकरूंना आकर्षित करते लालेलाल गोडशेव

त्यांचा संशय आल्याने मजुरांना भेटून पैसे देतो, असे बोडके यांनी सांगितले. त्यानंतर मजुरांकडे जात असल्याच्या बहाण्याने त्यांना जगदीशपाडा येथे नेण्यात आले. मजूर कामावर आल्यानंतर पैसे देतो, असे सांगितल्यानंतर संशयितांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांच्या शरीराचे तुकडे करून जंगलात फेकून देण्याची धमकी देण्यात आली.

पिंटू रतन याने आकाश बोडके याचा मोबाईल हिसकावून घेतला. सचिन पावरा याने अरुण बोडके यांच्या मानेवर कोयता टेकवून खिशातील एक लाख ६० हजार रुपयांची रोकड काढून घेतली. पैसे घेऊन संशयित पळून गेले. बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात संशयितांविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: Dhule News : स्वावलंबनाचा लामकानी शेतकरी पॅटर्न; गटशेतीचा लाभ