
धुळ्याचे क्षेत्र वाढले; नियोजन शून्य!
धुळे - इतर कुणीही नाही, मात्र शहराचे आमदार फारुक शाह यांनी वाहतुकीची कोंडी फोडण्यात स्वारस्य दाखविले आहे. शहरातील या ज्वलंत प्रश्नावर महिन्याभरात उपाययोजनांचा अहवाल सादर केला जाईल. नंतर अंमलबजावणी प्रक्रिया सुरू केली जाईल. यात हद्दवाढीमुळे धुळे शहरावर विविध प्रकारचा भार वाढला आहे. लोकसंख्येसह वाहनांच्या वाढत्या संख्येचा भार धुळे शहर भविष्यात कसे पेलेल? याचा विचार अजूनही झाला नाही तर परमेश्वरच आपले भले करो, असे म्हणायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
वाहतूकप्रश्नी आमदार शाह यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. तीत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी पीपीटीद्वारे वाहतुकीच्या कोंडीची ठिकाणे आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याविषयी मांडणी केली. त्यावर महिन्याभरात अहवाल सादर झाल्यानंतर सर्वानुमते उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू होईल.
अहवालावर कार्यवाही व्हावी
अलिकडे शिरपूर, नंदुरबार, मालेगाव, जळगाव, नाशिक शहराप्रमाणे धुळे शहराचा सर्वांगिण विकास व्हावा, अशी प्रत्येक धुळेकरास अपेक्षा आहे. परंतु, समस्या सुटण्याऐवजी धुळे शहरात त्या गतीने गुंतागुंतीच्या होत असल्याचे दिसते. या स्थितीत वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर ठरला आहे. याप्रश्नी वेळोवेळी ओरड झाल्यानंतर संबंधित विभागाच्या तत्कालिन प्रमुख अधिकाऱ्यांनी समितीची स्थापना करत उपाययोजनांसंबंधी अहवाल तयार केला. मात्र, त्यावर पुढे ना नियोजन ना कार्यवाही झाल्याने वाहतुकीचा प्रश्न जटील होत गेला. आता पुन्हा आमदार शाह यांच्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांच्यासह संबंधित अधिकारी हा प्रश्न धसास लावतात की काय होते हे पाहणे गरजेचे ठरेल.
लोकसंख्येचा वाढता भार
धुळे शहराची चार वर्षांपूर्वी हद्दवाढ झाली. यात वलवाडी, भोकर, नकाणे, मोराणे, महिंदळे, चितोड, वरखेडी, बाळापूर, पिंपरी, अवधान, नगाव (अंशतः), अशा अकरा गावांचा समावेश झाला. शासकीय नोंदीनुसार हद्दवाढीपूर्वी शहराची लोकसंख्या सरासरी अडीच ते तीन लाख होती. हद्दवाढीमुळे संबंधित गावांची सरासरी ७५ ते ८५ हजार लोकसंख्या धुळे शहराला जोडली गेली. त्यामुळे शहराची एकूण लोकसंख्या पावणेचार लाखांवर पोचली. ती सरासरी आता सुमारे साडेचार लाखांपर्यंत आहे. तसेच हद्दवाढीपूर्वी शहराचा परिघ सरासरी ४६.४६ चौरस मीटर होता, तो आता सरासरी १०१.०८ चौरस मीटर आहे. स्वाभाविकपणे शहराचे क्षेत्र वाढल्याने भविष्यातील वेध घेऊन वाहतुकीसह अनेक प्रश्न सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, राजकीय व सामाजिक पक्ष, संघटनांना हाताळावी लागणार आहे. त्यातील दुर्लक्षाची चूक महागात पडू शकते याची जाणीव ठेऊन नियोजनावर भर देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
सव्वापाच लाख वाहने अन् भार...
आरटीओ विभागाकडील नोंदीनुसार धुळे जिल्ह्यात सद्यःस्थितीत विविध प्रकारची सरासरी सव्वापाच लाख वाहने आहेत. त्यातील धुळे शहर व तालुक्यातील ५० टक्के वाहनांचा भार एकट्या धुळे शहराला उचलावा लागत आहे. ही गंभीर स्थिती पाहिली तर पार्किंगसह शहराच्या नियोजनासाठी किती काटेकोरपणे रचनात्मक कार्याची उभारणी करावी लागणार आहे हे लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी आणि महापालिकेला डोळसपणे पाहावे लागेल.
Web Title: Burden On Dhule City Increased Due To Increase Area
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..