गुरू-शिष्याच्या ‘कॅलिग्राफी’ कलेचा असाही गौरव!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

अशा प्रकारच्या जागतिक स्तरावरील ‘कॅलिग्राफी कॉन्वर्सेशन’साठी माझे गुरू अच्युत पालव यांच्यासह मलाही निमंत्रण मिळणे, ही माझ्यासाठी गौरवाची आणि आपल्या खानदेशसाठी अभिमानाची बाब मी समजतो. 
- अमोल सराफ (कॅलिग्राफी आर्टिस्ट)

जळगाव - अमेरिकेतील ‘कॅलिग्राफीज इन कॉन्वर्सेशन’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘कॅलिग्राफी’ प्रदर्शनात प्रेझेंटेशनसाठी खानदेशचे कलावंत अमोल सराफ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सॅनफ्रान्सिस्को सेंटर ऑफ द बुक्‍स येथे हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे अमोल सराफ यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकविणारे अच्युत पालव हेदेखील प्रदर्शनासाठी निमंत्रित असून, यानिमित्ताने दोन्ही गुरू-शिष्यांना एकाच व्यासपीठावर कलाकृतीचे सादरीकरण करता येणार आहे.

या वेळचे हे सहावे प्रदर्शन असून, त्यासाठी जगभरातील निवडक कॅलिग्राफी आर्टिस्टना निमंत्रित करणे आणि दुसऱ्या प्रकारात ‘ओपन कॉल’द्वारे काही कलाकार सहभागी होतील. 

सराफ बंधूंची निवड
‘ओपन कॉल’ प्रकारातून जगभरातून १०० कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी केवळ १५ कलाकृतींनाच स्थान मिळाले असून, त्यात मोहन सराफ यांच्या तीनही कलाकृतींची निवड झाली आहे; तर त्यांचे बंधू अमोल सराफ यांना ‘कॅलिग्राफी मास्टर्स’ म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या प्रकारात भारतातून अच्युत पालव व गोरी युसूफ हुसैन यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. हे तिघेही कलावंत एकाच वेळी आपापल्या शैलीत कॅलिग्राफीचे सादरीकरण करतील. 

श्‍लोकांवर ‘लाइव्ह डेमो’
अमोल सराफ यांची कॅलिग्राफीतील विशिष्ट शैली असून, ते या प्रदर्शनात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा संस्कृत भाषेतील श्‍लोकांवरील कॅलिग्राफीची ‘लाइव्ह डेमोस्ट्रेशन’ कार्यशाळा घेणार आहेत. मोहन व अमोल सराफ बंधूंना या कलेचा वारसा त्यांचे वडील जयंत सराफ यांच्याकडून मिळाला. तो वारसा जपला, जोपासला आणि सातासमुद्रापार नेण्यात दोन्ही बंधूंनी यश मिळविले आहे.

अमोल यांना विशेष ‘व्हिसा’
अमोल सराफ अमेरिकेतील टांपा फ्लोरिडा येथे स्थायिक आहेत. त्यांना अमेरिकेचा ‘extra ordinary ablity- special ctegory Artist’ हा विशेष ‘व्हिसा’ प्रदान करण्यात आला आहे. कला क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा ‘व्हिसा’ देण्यात येतो. विशेष म्हणजे त्यांना पुढच्या टप्प्यातील ‘extra ordinary ablitiy greee card’ देण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caligraphy Art honor