येवला : छगन भुजबळ सलग चौथ्यांदा विजयी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

- येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात अनेकांचे अंदाज चुकवत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी विजयी चौकार मारला.

येवला : येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात भल्याभल्याचे अंदाज चुकवत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी विजयी चौकार मारला आहे. विशेष म्हणजे सर्व प्रमुख नेते एकवटल्यानंतरही भुजबळांच्या सोबत मतदार राहिल्याने भुजबळांनी सुमारे 50 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले.

येवला मतदारसंघात यावेळी भुजबळ हटावचा नारा देऊन भूमिपुत्राला संधी द्या, असे आवाहन करत विरोधकांनी रान पेटविले होते. विशेष म्हणजे भुजबळ येथील पाहुणे असून, त्यांना येथून घालवण्यासाठी राष्ट्रवादीचेच नेते माणिकराव शिंदे यांनी बंड पुकारत पवारांना उघडपणे पाठिंबा दिला होता.

शिंदे यांच्यासह मारोतराव पवार व कल्याणराव पाटील हे दोन माजी आमदार तर नरेंद्र दराडे व किशोर दराडे हे दोन स्थानिक स्वराज्य संस्थांचे आमदार आणि लासलगाव भागातील भाजप नेते नानासाहेब पाटील व डी.के. जगताप हेही सोबत असल्याने पवारांची ताकद नक्कीच वाढली होती. परंतु निवडणुकीच्या तोंडावर शर्तीचे प्रयत्न करून भुजबळानी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करून त्याचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याला ४७ वर्षात प्रथमच प्रवाहित करत येवल्यात आणले होते. याचा मोठा फायदा भुजबळांना झाला असून, या भागात पवारांचे नातेगोते असतानाही भुजबळांना जास्त मते मिळाली आहे.

अनेकांनी भुजबळांना ही निवडणूक कठीण असल्याचा अंदाज वर्तवला होता. पण मतदारांनी सर्वांचे अंदाज साफ खोटे ठरवले आहे. किंबहुना कोणी 10 हजाराच्या तर कोणी 40 हजाराच्या फरकाने भुजबळ विजयी होतील, असे वाटत असताना मतदारांनी विक्रमी मताधिक्याने भुजबळांच्या विजयाचा चौकर ठोकला आहे. तीन वाजेपर्यंत येथे 17 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली होती व भुजबळांना ४१ हजार ४०१ मतांचे मताधिक्य मिळाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal win in Yevla Vidhan Sabha 2019