सोनगीरचा दर्शनी भाग स्वच्छ करा ; तनिष्का गटाची मागणी

एल. बी. चौधरी 
शुक्रवार, 22 जून 2018

चौपदरीकरण होऊन चार वर्षे झाली. गावातून बालाजीनगर वसाहतीकडे जाण्यासाठी मुंबई आग्रा महामार्गावर लहान बोगदा तयार करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात बोगद्यात पाणी साचते.

सोनगीर (जिल्हा धुळे) : मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे ते पळासनेर मार्गाचे चौपदरीकरण झाले. गावाच्या दर्शनी भागात पिराचे स्थानाशेजारी महामार्गालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी पूल बांधले आहेत. मात्र, पुलाची उंची कमी असल्याने व वाहून जाणाऱ्या पाण्याला व्यवस्थित उतार नसल्याने पाणी व चिखल साचतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, गावाचा दर्शनी भागच खराब दिसत असल्याने नवीन येणाऱ्यांना गावाविषयी काहीसा तिरस्कार निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर सांडपाण्याचा नाला साफ करून तेथे शोषखड्डे बनवावेत, घाणीचे साम्राज्य दूर करावे, अशी मागणी येथील तनिष्का गटाने एका निवेदनाद्वारे सरवड ता. धुळे येथील टोल प्लाझा प्रशासनाला दिले.         

चौपदरीकरण होऊन चार वर्षे झाली. गावातून बालाजीनगर वसाहतीकडे जाण्यासाठी मुंबई आग्रा महामार्गावर लहान बोगदा तयार करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात बोगद्यात पाणी साचते. पाण्याचा निचरा होण्यासाठी चौपदरीकरण करणार्‍या कंपनीने कोणतीच व्यवस्था न केल्याने बालाजीनगरमधील रहिवाशांना व विद्यार्थ्यांना धोकादायक महामार्ग ओलांडून गावात यावे लागते. शिवाय पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गावाजवळ महामार्गालगत दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड नाही. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही ट्रॅकवर विरुद्ध दिशेने देखील धोकादायक वाहतूक सुरू असते. 

वाघाडी फाटा, पोलिस ठाणे व  सोनगीर फाटा हे अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. यावर कोणतीही उपाययोजना होत नाही. पण किमान दर्शनी भागातील घाणीचे साम्राज्य, काटेरी झाडे- झुडपे काढूून पाणी निचरा होण्यास योग्य मार्ग करावा. दर्शनी भागाचे रुप पालटावे अशी मागणी पंचायत समिती सदस्या तथा तनिष्का गट प्रमुख रुपाली माळी, तनिष्का सदस्या शकुंतला चौधरी, प्रतिभा लोहार, स्मिता कासार, छाया चंद्रशेखर कासार, मनिषा देशमुख, नुतन महाजन, छाया राजेंंद्र कासार, सुलभा ईशी आदींनी निवेदनाद्वारे केली. टोलप्लाझाचे जनसंपर्क अधिकारी हरीश जाधव यांनी निवेदन स्वीकारले आणि दोन दिवसांत पाहणी व कामाला सुरवात करतो असे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Clean the Sonargir Tanishka group demanded