कलेक्‍टर साहेब, याला "लॉकडाउन' म्हणायचे का? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

24 मार्चपासून "लॉकडाउन' सुरू झाल्यानंतर जळगाव शहर व जिल्ह्यात सुरवातीचे काही दिवस त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली. नंतर मात्र संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस यंत्रणाही ढिली पडली.

जळगाव : मार्चअखेरीस दोन "कोरोना'ग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतरचे 18 दिवस एकही नवा रुग्ण नव्हता. मात्र, तीन दिवसांत आणखी तीन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली असताना "लॉकडाउन'ला हरताळ फासत शेकडो नागरिक जळगाव शहरासह जिल्ह्यातील इतरही भागात सर्रास रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. रस्त्यांवरील गर्दी जिल्ह्याला "रेड झोन'कडे घेऊन जाणारी ठरेल का, असा प्रश्‍नही उपस्थित होतोय. हे चित्र पाहून "याला लॉकडाउन म्हणायचे का,' असा प्रश्‍न जिल्हाधिकाऱ्यांना विचारल्यास वावगे ठरणार नाही. 
 
जगात आणि देशातही "कोरोना' संसर्गाने थैमान घातले आहे. महाराष्ट्राची स्थिती अतिगंभीर आहे. मार्चअखेरपर्यंत खानदेश "कोरोनामुक्त' होता. मात्र, 28 मार्चला जळगावात "कोरोना'चा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर यंत्रणा जागी झाली. लगेच दोनच दिवसांत दुसरा रुग्ण आढळून त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे जळगाव शहरात तातडीने उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यानंतरच्या 18 दिवसांत जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही, ही समाधानाची बाब होती. 

गर्दी कमी होईना 
असे असले, तरी 24 मार्चपासून "लॉकडाउन' सुरू झाल्यानंतर जळगाव शहर व जिल्ह्यात सुरवातीचे काही दिवस त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली. नंतर मात्र संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस यंत्रणाही ढिली पडली. गेल्या पंधरा दिवसांचे चित्र तर अत्यंत विदारक असेच होते व आजही आहे. बाजार समितीत अनेक दिवस प्रचंड गर्दी झाली. बाजारात, किराणा दुकानांसह मेडिकल, भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आजही होत आहे. पण, या गर्दीला हटकणारे पोलिस दिसत नाहीत. काही प्रमुख चौकात पोलिस आहेत, ते मोजक्‍या वाहनधारकांना अडवितात, तरीही रस्त्यारस्त्यांवरील गर्दीचे चित्र "लॉकडाउन'ला हरताळ फासल्याचेच द्योतक आहे. 

प्रशासन गंभीर कधी होणार? 
गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठीही वेळेचे बंधन घालून देत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच अशी वेळ दिली. भरउन्हात गरजूच बाहेर पडतील, असा यामागचा उद्देश. मात्र, झाले उलटेच. सकाळी अकराला शेकडोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आणि खरेदीसाठी गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून आले. दुपारी दोन ते चार या वेळेत तापमानामुळे गर्दीवर परिणाम तेवढा झाल्याचे दिसले. मात्र, सायंकाळी पाचनंतरही रस्त्यांवर गर्दी दिसून येत होती. 

पोलिस आहेत कुठे? 
"लॉकडाउन'च्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र सध्यातरी दिसतेय. काही प्रमुख मार्गांवर तैनात पोलिस कुणालाही अडविताना दिसत नाही, अडविले तरी कारण ऐकून सोडून देतात. आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, कोर्ट चौक, टॉवर चौकात काही वेळा पोलिस असतात. पण, ते त्यांच्याच गप्पांमध्ये रंगलेले दिसतात. 

भाजी बाजाराला आवरा... 
आठवडे बाजारावर बंदी असताना मंगळवारी हरिविठ्ठलनगर भागात भाजी बाजार भरला आणि गर्दी जमली; तर बुधवारी पिंप्राळा परिसरात नेहमीच्या जागेवर नाही, पण मोकळ्या जागेत भरलेल्या बाजारात कुठलेही "सोशल डिस्टन्सिंग'चे पालन झाल्याचे दिसत नव्हते. केवळ भाजी बाजारच नव्हे; तर फळे, औषधी, किराणा घेण्यासाठीही एकेका वाहनावर दोन- तीन जणांची रपेट निघालेली दिसते. त्यामुळे या बाजारांनाही आवर घाला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

"रेड झोन'ची वाट पाहतोय का? 
एप्रिलच्या पहिल्या 18 दिवसांत जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण नव्हता. पण, दोनच दिवसांत तीन रुग्ण आढळून आल्यानंतरही नागरिक वठणीवर यायला तयार नाहीत. प्रशासन, पोलिस यंत्रणाही केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या (बुधवारी सायंकाळी सातपर्यंतची आकडेवारी) पाच रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला, एक रुग्ण बरा झाला आहे. उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. असे असताना नागरिक शहाणे आणि प्रशासन व पोलिस यंत्रणा सतर्क होणार नसेल, तर जळगाव जिल्हा "रेड झोन' होण्याची आपण वाट पाहतोय का, असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector, why do you call it "lockdown"?