धक्कादायक...नंदुरबारमध्ये कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

या रूग्णाने पंधरा वीस दिवसापूर्वी शहरातील एका खासगी डॉक्‍टरांकडे त्याने उपचार घेतले, त्यानंतर काहीही फरक न पडल्याने पुन्हा दुसऱ्या खासगी डॉक्‍टरकडे गेला. तेथही फरक पडला नाही, शेवटी तेथील डॉक्‍टरने योग्य ती तपासणी केल्यानंतर त्यांना संशय आला. मग तो जिल्हा रुग्णालयात गेला. दरम्यानच्या काळात जर स्वतःहून जिल्हा रूग्णालयात दाखल झाला असता तर पुढील अनेकांना संभाव्य संसर्ग होण्याचे टळले असते.

नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या तरुणाचा बुधवारी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना श्‍वसनाचा त्रास होता व त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, जिल्ह्यातील हा कोरोनाचा पहिला बळी आहे. 

मृत तरुण हा फळांचा व्यापारी होता. गेले पंधरा दिवस तो लॉकडाऊन काळात तालुक्‍यातील पंधरा ते वीस खेड्यात फिरत होता, अशी माहिती समोर आल्याने प्रशासनाचेही धाबे दणाणले असून, तो किती जणांच्या संपर्कात आला, यांचा शोध घेण्याचे दिव्य प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. 

 

प्रशासनाकडून शोध मोहीम 
शहादा शहर व परिसरातील नागरिकांची झोप उडाली असून, हा मृत तरुण केळी पिकाचा व्यापारी आहे. हा वडिलोपार्जित व्यवसाय करतो. ब्राम्हणपुरी हे गांव केळीचे प्रमुख आगार आहे. हा व्यवसाय करीत असतांना रुग्णाचा ब्राम्हणपुरी व परिसरातील शेतकऱ्यांशी व्यवसायानिमित्त जवळचे संबंध आहेत. या रुग्णाचे शेतकरी व मजुर वर्गाशी जवळचे संबंध आले आहेत का याची प्रशासन चाचपणी करीत आहे. 

 

तर अनेकांचा धोका टळला असता 
या रूग्णाने पंधरा वीस दिवसापूर्वी शहरातील एका खासगी डॉक्‍टरांकडे त्याने उपचार घेतले, त्यानंतर काहीही फरक न पडल्याने पुन्हा दुसऱ्या खासगी डॉक्‍टरकडे गेला. तेथही फरक पडला नाही, शेवटी तेथील डॉक्‍टरने योग्य ती तपासणी केल्यानंतर त्यांना संशय आला. मग तो जिल्हा रुग्णालयात गेला. दरम्यानच्या काळात जर स्वतःहून जिल्हा रूग्णालयात दाखल झाला असता तर पुढील अनेकांना संभाव्य संसर्ग होण्याचे टळले असते. त्यांच्या आई वडिलांची सुध्दा तपासणी केली असता आईलाही संसर्ग झाला आहे. आरोग्य विभाग यंत्रणा पुढील चाचपणी करीत आहे. केळी पिकाचा व्यवसाय करीत असताना कोण कोणाशी संबंध आला आहे हे शोधणे आव्हान आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती चौकशी होणे अवश्‍यक आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona-infected youth dies in Nandurbar