
संपर्क साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य हवे असून, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम व अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गर्दी करू नये.
शहादा : कलमाडी शहादा (ता. शहादा) येथे एकाच दिवशी ५४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नंदूरबार जिल्ह्याची चिंता वाढली असून कलमाडी गावात आरोग्य विभागाचे पथकाकडून उपायोजना राबवणे सुरू केला आहे.
आवश्य वाचा- गडचिरोलीत सेवा बजाविणार्या नंदूरबारच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
कलमाडी गावात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नका असे प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र वळवी यांनी आव्हान केले आहे.
साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक
संपर्क साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य हवे असून, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम व अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गर्दी करू नये. शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. गिरासे यांनी केले.
शिबीरातून आले समोर
कलमाडी गावात आरोग्य विभागाने तपासणी शिबीर घेतले. यात १०४ व्यक्तींचे स्वॅब घेतले होते. त्यातील ५४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.
आणि उपायोजना सुरू
कलमाडी कोरोना रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागातर्फे धुरळणी, फवारणी त्याचबरोबर विविध आरोग्य पथके स्थापन करून कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. कुटुंबनिहाय सर्वेक्षण सुरू झाले आहे. गावकऱ्यांनी घाबरून न जाता आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आवर्जून वाचा- दुर्दैवी घटना : जवानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावकरी तयारीत; एक फोन आला, दुःखाचा डोंगर कोसळला
जिल्ह्यात पहिलीच घटना
एवढी रुग्णसंख्या सापडणारे जिल्ह्यातील बहुदा पहिलेच गाव असावे. रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेंसिंगही सुरू आहे. सध्या लॉकडाउन उघडल्याने सर्वत्र अलबेल आहे. कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा सामूहिक प्रयत्न करून काळजी घेणे गरजेचे आहे.
लक्षणे असलेल्या रुग्णांनी माहिती लपवू नये. घाबरून जाऊ नये. आरोग्य विभागास सहकार्य करावे. कार्यक्रमांमध्ये गर्दी करू नये. शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे.
-डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार
संपादन- भूषण श्रीखंडे