शर्टवर भस्म टाकताच शेतकऱ्याला भुरळ आली; क्षणात डिक्‍कीतून कर्जाचे पैसे लंपास   

कमलेश पटेल
Thursday, 7 January 2021

मागून एक व्यक्ती आला आणि शेतकऱ्याच्या शर्टवर राखेसारखे भस्म टाकले आणि क्षणात भुरळ आली..

शहादा : शहरातील भाजी मार्केट परिसरातील युनियन बँकेच्या शाखेत शेतकरी कृषी कर्जाचे पैसे काढण्यासाठी गेले. पैसे काढून दुचाकीच्या डिक्कीत कृषी कर्जाची रक्कम ठेवताच एका व्यक्तीने शर्टवर राखसारखे भस्म टाकले. क्षणात शेतकऱ्यास भुरळ येताच चोरट्याने डिक्कीतून कर्जाची रक्कम डिक्कीतून लांबविल्याची घटना घडली. 

आवश्य वाचा- पुरणपोळी, बिबडी, मेहरुण बोरांना ‘जीआय’मानांकनाचा प्रस्ताव 

कळमसर मोहिदा (ता. तळोदा) येथील रतिलाल पाटील या शेतकऱ्यास कृषी कर्ज मंजूर झालेले होते. शहादा येथील भाजीपाला मार्केटमधील युनियन बँकेत जमा झालेली ही रक्कम काढण्यासाठी पाटील हे नारायण पाटील यांच्यासह (एमएच ३९, आर ७५७४) या दुचाकीने शहादा येथे आल्यानंतर बँकेतील खात्यातून रक्कम काढून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवून उभे होते. त्यांच्यासोबतचे नारायण पाटील हे मोबाईल दुरुस्तीसाठी बँकेपासून काही अंतरावरील मोबाईल शॉपवर गेले.

मागून आला आणि...

यावेळी रतिलाल पाटील यांच्या मागून एक व्यक्ती आला आणि रतिलाल पाटील यांच्या शर्टवर राखेसारखे भस्म टाकले. आणि रतिलाल यांना क्षणात भुरळ आली, काही समजण्याच्या आत चोरट्याने डिकीतून संपूर्ण रक्कम चोरून पोबारा केला.

आवश्य वाचा- घरावर पाळत ठेवली आणि चोरट्यांनी सायंकाळीच हातसफाई केली 
..

पोलिसात धाव 

काही मिनिटांनी मोबाईल दुरुस्त करून नारायण पाटील परत आले असता त्यांनी रतिलाल पाटील हे गोंधळल्याचे पाहून शर्टवर काय पडले हे विचारले. त्यांच्या लक्षात आले नाही त्यांनी डिक्की उघडून पाहिले असता त्यातील रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत या घटनेची माहिती दिली.  
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news bhusawal farmer stole thief loan amount