
सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्या 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
नंदुरबार : जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी वारंवार नागरिकांमध्ये सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेट्स न ठेवण्याबाबत जागृती करणारे आवाहन करूनही सोशल मीडियाचा गैरवापर करीत आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्या जिल्ह्यातील आठ जणांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात आली आहे.
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करत आहे. सोशल मीडियाचा वापर करून वेळेची बचत तसेच चांगले लेख, व्हिडिओ प्रसारित करून चांगले संदेश देता येतात. परंतु काही लोक सोशल मीडियावरून दोन धर्मांत तेढ निर्माण होईल, अशा आक्षेपार्ह पोस्ट, लेख लिहून जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्यात काही दिवसांपासून काही गोष्टींचे निषेधार्थ किंवा समर्थनार्थ सोशल मीडियावर दोन धर्मांत जातीय तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे स्टेट्स किंवा मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा लोकांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
हेही वाचा: धक्कादायक ! भाजप नेत्याने पत्नीवर झाडल्या गोळ्या...नंतर स्वतः केली आत्महत्या
गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेट्स किंवा मजकूर प्रसारित केल्यामुळे नंदुरबार शहर पोलिस येथे तीन, अक्कलकुवा (दोन) व शहादा पोलिस ठाणे येथे तीन गुन्हे असे एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेट्स किंवा मजकूर प्रसारित केल्याच्या निषेधार्थ बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी (नंदुरबार) यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे एक गुन्हा, शहादा (एक) गुन्हा, नवापूर (एक), अक्कलकुवा (एक) असे एकूण चार गुन्हे दाखल करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
''फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित करू नये किंवा आक्षेपार्ह स्टेट्स ठेवू नये. तसेच जमावबंदी आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये. कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही.'' - पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार
हेही वाचा: अबब! चक्क ३५ हजार झाडांची चोरी; पोलिसांत तक्रार
Web Title: Crimes Filed Against 8 Persons For Posting Offensive Statuses On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..