कळ्यांचा मारेकरी तुरूंगातही मोकाट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

नाशिक : गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डॉ. बळिराम निंबा शिंदे नावाच्या डॉक्‍टरच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मृत्यूबाबत बीडच्या कुप्रसिद्ध डॉ. सुदाम मुंडे याचा संदर्भ येऊनही राज्याच्या तुरुंग प्रशासनाने ते प्रकरण दडपले. काही प्रत्यक्षदर्शी बंदींचे नातेवाईक, प्रशासनातील "व्हीसल ब्लोअर'ने तुरुंग विभागाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक व राज्यपालांपर्यंत केलेल्या तक्रारी मोठे षड्‌यंत्र असल्याचे सूचित करत असताना तत्कालीन अधीक्षकांची तडकाफडकी बदली व डॉ. मुंडे याची औरंगाबादला रवानगी करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला, असे उजेडात आले आहे. 

नाशिक : गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डॉ. बळिराम निंबा शिंदे नावाच्या डॉक्‍टरच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मृत्यूबाबत बीडच्या कुप्रसिद्ध डॉ. सुदाम मुंडे याचा संदर्भ येऊनही राज्याच्या तुरुंग प्रशासनाने ते प्रकरण दडपले. काही प्रत्यक्षदर्शी बंदींचे नातेवाईक, प्रशासनातील "व्हीसल ब्लोअर'ने तुरुंग विभागाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक व राज्यपालांपर्यंत केलेल्या तक्रारी मोठे षड्‌यंत्र असल्याचे सूचित करत असताना तत्कालीन अधीक्षकांची तडकाफडकी बदली व डॉ. मुंडे याची औरंगाबादला रवानगी करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला, असे उजेडात आले आहे. 

सोळा महिन्यांपूर्वी, 2 व 3 मार्च 2017 च्या मध्यरात्री डॉ. शिंदे याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले गेले; परंतु उपचारावेळी तिथे देशभर गाजलेल्या परळीच्या अशाच प्रकरणातील डॉ. सुदाम मुंडे हजर असल्याचा आणि तीव्र मधुमेह असलेल्या डॉ. शिंदे यांना मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत प्रचंड प्रमाणात ग्लुकोज देण्यात आल्याचा संशय आहे. याच्या तक्रारी थेट राज्यपालांपर्यंत होऊनही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याऐवजी कारागृह अधीक्षकांची तातडीने बदली केली गेली आणि वारंवार पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दाखवून डॉ. मुंडेला औरंगाबादच्या हर्सूल मध्यवर्ती कारागृहात हलविले गेले. मृत डॉ. बळिराम शिंदे याच्या परिवाराने मात्र तो विषय आमच्यासाठी संपल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कारागृहातील संशयास्पद नोंदी 
नाशिक महापालिकेच्या आरोग्य पथकाने 19 फेब्रुवारी 2017 ला डॉ. बळिराम शिंदे याच्या विनापरवाना हॉस्पिटलवर छापा टाकला. मुंबई नाका पोलिसांनी अनधिकृत गर्भलिंगनिदान, स्त्रीभ्रूणहत्याप्रकरणी त्याला अटक केली. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्याची सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. 26 फेब्रुवारीला न्यायालयीन कोठडी मिळाली व त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पाठविले गेले. गुरुवार (ता. 2 मार्च) रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी त्यांच्या छातीत दुखू लागले. दहा मिनिटांत त्यांना कारागृहातील दवाखान्यात नेण्यात आले.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमावत उपस्थित नसल्याने त्यांचे कनिष्ठ सहकारी डॉ. एन. आर. ससाणे यांना बोलाविण्यात आले. जवळपास दोन तासांनी, रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी डॉ. शिंदे याला सामान्य रुग्णालयात हलविण्याची सूचना केली. त्या सूचनेची अंमलबजावणी झाली नाही. रात्री एक वाजून 40 मिनिटांनी डॉ. शिंदे याला मृत घोषित करण्यात आले. कारागृह रोजकिर्दीमधील फॉर्म क्रमांक 32 वरील नोंदींनुसार, एक वाजून 55 मिनिटांनी तत्कालीन अधीक्षक रमेश कांबळे कारागृहात आले व त्यांनी मानवाधिकार आयोग, वरिष्ठ कार्यालय व बंदी डॉ. शिंदे याच्या नातेवाइकांना मृत्यूबाबत कळविण्याची लेखी सूचना केली. त्याआधीच्या डॉ. शिंदे याला सामान्य रुग्णालयात पाठविण्याच्या सूचनेवर मात्र कांबळे यांनी काही दिवसांनंतर शेरा मारल्याचे पुरावे "सकाळ'च्या हाती लागले आहेत. 

कुठल्याही कैद्याच्या मृत्यूची कारागृह प्रशासन, मानवी हक्क आयोग वगैरे यंत्रणांमार्फत चौकशी होतेच. त्यानुसार नाशिक रोड कारागृहातील मृत्यू प्रकरण किंवा अन्य कैदी डॉक्‍टरनेच त्यावर केलेले उपचार, अधीक्षकांची बदली या बाबींची चौकशी सक्षम यंत्रणेमार्फत सुरू आहे. त्यातून जे काही सत्य असेल ते पुढे येईलच. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलिस महासंचालक, कारागृह विभाग, महाराष्ट्र 

राज्यातील तुरुंगांमध्ये झालेल्या सगळ्याच मृत्यूंची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यातून कारागृह प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लागेबांधे उजेडात येतील. त्यादृष्टीने गेली काही वर्षे मी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. 
- अनिल बुरकुल, तुरुंगरक्षक व व्हीसल ब्लोअर, धुळे/नाशिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal doctors who was killed female fetus are free in jail