ग्रा.प.निधीचे काय झाले, विचारणाऱ्याची...कापली जीभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

ग्रामपंचायतीला अनुसूचित जातीसाठी किती निधी आला, त्याचे काय झाले, याची विचारणा केल्याचा राग येऊन ममुराबाद बसस्थानकाजवळ संशयित भरत हिवरकर याने थांबवून कायरे..काय? म्हणत होता तू..तुमच्या समाजाचा सरपंच झाला म्हणून तुम्ही जास्त मातले आहे. असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली.

जळगाव : ममुराबाद ग्रामपंचायतीला अनुसूचित जातीसाठी किती निधी आला, त्याचे काय झाले, याची विचारणा केल्याचा राग येऊन संशयितांनी मागील भांडण उकरून काढत. चंद्रकांत विजय बोरसे (रा. इंदिरानगर ममुराबाद) याला जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकांत बोरसे याची जीभ कापली गेली असून त्याची आई, बहीण व काका अशांनाही मारहाण झाल्याची घटना 2 डिसेंबरला घडली होती. जखमीच्या उपचारानंतर पोलिसांनी जाब-जबाब घेतल्यावर 12 संशयितांविरुद्ध ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. 

ममुराबाद येथील कुंभारवाड्यात चंद्रकांत बोरसे हे पत्नी मीनाबाई, वडील श्रीधर बोरसे, आई कस्तुराबाई यांच्यासह राहतात. सरपंच भारती गोपाळ मोरे या समाजातीलच असल्याने समाजासाठी नेमका किती निधी आला याची विचारणा काही सदस्यांना चंद्रकांत बोरसे याने केली. आता आमच्या समाजाच्या सरपंच झाल्या आहेत, त्याचा गावाला फायदाच होणार असल्याचे चंद्रकांत गावात सांगत होता. त्याचा राग येऊन 4 नोव्हेंबरला सकाळी दहाला बसस्थानकाजवळ संशयित भरत हिवरकर याने थांबवून कायरे..काय? म्हणत होता तू..तुमच्या समाजाचा सरपंच झाला म्हणून तुम्ही जास्त मातले आहे. असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली. मात्र, त्यावेळेस गावचा विषय असल्याने इतर ग्रामस्थांनी वाद सोडवून समजूत घातली. मात्र, तेव्हापासूनच संशयिताचा चंद्रकांत बोरसे याच्यावर डाव होता. 

आई, काकासह बहिणीला मारहाण 
2 डिसेंबरला रात्री नऊला चंद्रकांत बोरसे कुंभारवाड्यात गेला होता. येथे पूर्वीपासूनच रागात असलेल्या भरत हिवरकर याने काय रे...इकडे ये, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. तेव्हा बुधा हिवरकर याच्यासह इतरांनीही लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. तेव्हा चंद्रकांतची आई, बहीण तसेच काका हे भांडण सोडविण्यास आले असता, त्यांनाही जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकांतची जीभ कापल्या गेली. उपचारानंतर चंद्रकांत बोरसे याचा पोलिसांनी जाबजबाब घेतला. त्यावरून, भरत हिवरकर, बुधा हिवरकर, पृथ्वीराज पाटील, भिका पाटील, आबा दूधवाला. संजय कुंभार, कडू कुंभार, श्‍याम बारकू कुंभार, प्रमोद कुंभार, दत्तू कुंभार, बुधा कुंभार या 12 जणांविरोधात ऍट्रासीटीअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन करीत आहेत. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cuting tought of yonger in mamurabad jalgaon