'सी-व्हिजिल'वर तक्रारीऐवजी सेल्फी पाठवून थट्टा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

नाशिक - लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सिटिझन व्हिजिलन्सअंतर्गत "सी-व्हिजिल' हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाईल ऍप्लिकेशन उपलब्ध करून दिले खरे; पण त्यावर सध्या तक्रारींऐवजी काही ठिकाणी मोबाईल ऍपवर स्वतःचेच सेल्फी पाठवून प्रशासनाची

नाशिक - लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सिटिझन व्हिजिलन्सअंतर्गत "सी-व्हिजिल' हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाईल ऍप्लिकेशन उपलब्ध करून दिले खरे; पण त्यावर सध्या तक्रारींऐवजी काही ठिकाणी मोबाईल ऍपवर स्वतःचेच सेल्फी पाठवून प्रशासनाची
चेष्टा सुरू झाली आहे. ऑनलाईन तक्रारीची पुढील 100 मिनिटांत सोडवणूक करायची असल्याने प्रशासनाला मात्र पोलिस, तहसीलदारासह सगळा लवाजमा घेऊन जावे लागत असल्याने मोबाईलचे "सी-व्हिजिल' ऍप हे थट्टेचा व गमतीचा विषय झाला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीला ऑनलाईन स्मार्ट ऍप्लिकेशनचा आधार असणार आहे. यंदा प्रथमच "सी-व्हिजिल' (Cvigil) हे जीपीएस प्रणालीवर आधारित मोबाईल ऍप्लिकेशन मतदारांना उपलब्ध झाले आहे. आचारसंहितेसोबत सुरू झालेल्या मोबाईल ऍप्लिकेशनवर ज्या तक्रारी येणार आहेत; त्यांच्या खातरजमा करून 100 मिनिटांत त्यावर कारवाईच्या निवडणूक आयोगाच्या सूचना असल्याने तक्रार आली रे आली की तहसीलदार, तीन पोलिस, लिपिक, जाबजबाब घेणाऱ्या यंत्रणेसह सगळा भरारी पथकाचा लवाजमा घटनास्थळी पोहचतो. मात्र, तेथे गेल्यावर तक्रार नसून केवळ खातरजमा करण्यासाठी केलेली गंमत असल्याचे लक्षात आल्यावर अशा गमतीवर 100 मिनिटांत काय अहवाल पाठवायचा, असा नवाच प्रश्‍न प्रशासकीय यंत्रणेपुढे उभा राहिला आहे.

ऍपवर 6 तक्रारी...
अवघ्या 20 मिनिटांत निवडणूक विभागाच्या भरारी पथकांनी जीपीएस लोकेशनच्या आधारे घटनास्थळी भेट द्यायची आहे. त्यानंतर पुढील 100 मिनिटांत आचारसंहिताभंगावर कारवाई अपेक्षित आहे. "सी-व्हिजिल' ऍपवर आतापर्यंत 6 तक्रारी आल्या आहेत. त्यात गंगापूर भागातील शंकरनगर येथील एकाने सेल्फी फोटो पाठवून धम्माल केली. पथक कारवाईला गेल्यावर तेथे सहज ऍपची तीव्रता तपासण्यासाठी सेल्फी पाठविल्याचे तक्रारदारांचे म्हणणे ऐकून पथकाच्या अधिकाऱ्यांवर डोक्‍यावर हात मारून घेण्याची वेळ आली. याशिवाय, इतर तक्रारीत एकाने देशात सामाजिक प्रश्‍न खूप वाढले आहेत, या आणि अशा प्रकारच्या तक्रारी लोक मोबाईल ऍपद्वारे काहीही प्रश्‍न मांडू लागल्याने मतदारांच्या गमती-जमतीने प्रशासकीय यंत्रणा मात्र हैराण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cvisil GPS complaint selfie