'इथल्या' भूमिगत विद्युत वाहिनीमुळे जीवाला धोका

SATANA UNDER.jpg
SATANA UNDER.jpg

सटाणा : शहरात सध्या लाखो रुपये खर्चून सुरू करण्यात आलेले भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित विभागाचे नियम धाब्यावर बसवणारे आहे. या कामामुळे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊन शहरवासीयांचा जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून नियमानुसारच काम पूर्ण करावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. 

उद्‌घाटन झाले ; मात्र कामच नियमबाह्य 
शहरातून जाणाऱ्या उघड्यावरील विद्युत तारांमुळे अपघात होऊ नये, म्हणून शासनाने लाखो रुपये खर्चाच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामाला मंजुरी दिली. या कामाचे तीन महिन्यांपूर्वी धुमधडाक्‍यात उद्‌घाटनही झाले. मात्र, हे पूर्ण कामच नियमबाह्य असल्याचे उघडकीस आले आहे. जुने अमरधाम ते मटन मार्केट, अहिल्यादेवी चौक, महालक्ष्मी मंदिर, देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर ते सुकड नाल्यापर्यंत 11 केव्ही उच्च दाबाच्या भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने करीत असल्याची चर्चा आहे.

एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ? - नागरिक

कामासाठी दीड मीटर खोलीची चारीचे खोदकाम करणे आवश्‍यक असून, संबंधित कामाच्या अंदाजपत्रकात तसे नमूद केले आहे. जेणेकरून उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे कोणात्याही जीविताला धोका निर्माण होणार नाही. मात्र, संबंधित ठेकेदाराने फक्त अडीच फुट चारीचे खोदकाम केल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे, तर विद्युत वाहिनी टाकण्यापूर्वी सहा इंच थराची वाळू टाकणे बंधनकारक आहे. मात्र, वाळूचा एक कणही टाकला नाही. जमिनीत विद्युतरोधक म्हणून वाळू टाकून त्याच्यावर हाफ राउंड पाईप टाकणे आवश्‍यक आहे. दुर्दैवाने विद्युत वाहिनी पंचर झाल्यास वाळू न टाकल्याने आणि निकृष्ट दर्जाचे हाफ राउंड पाईप टाकल्याने एखादी दुर्घटना घडली. त्याला जबाबदार कोण, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

उच्च आणि लघुदाब वाहिन्या एकत्र. 
वीज महावितरण कंपनीच्या नियमानुसार उच्चदाबाची आणि लघुदाब विद्युत वाहिन्या भूमिगत करताना एकत्र टाकता येत नाही. मात्र. नियमांचीच पायमल्ली झाली आहे. शहरात हे काम नागरीवस्तीतून करताना उच्चदाब आणि लघुदाबाच्या वाहिन्या एकत्र टाकणे सुरू आहे. दोन्ही वाहिन्या एकत्र टाकल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. 

प्रतिक्रिया 
भूमिगत विद्युत वाहिनीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. ठेकेदाराने शासनाचे नियम धाब्यावर बसविले आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी केल्या. मात्र, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळे शहरवासीयांच्या जीवाशी खेळले जात आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून नव्याने काम करावे, अन्यथा उपोषण करण्यात येईल. - मनोज सोनवणे, माजी नगरसेवक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com