
Dhule : वडिलांच्या चितेला मुलींनी दिला मुखाग्नी
शिरपूर (जि. धुळे) : आयुष्यभर भरभरून प्रेम करणाऱ्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला (Fathers Funeral) येण्यापासून तिला भौगोलिक अंतर, बिघडलेले हवामान रोखू शकले नाही. सातासमुद्रापलीकडून आलेल्या कन्येने पित्याच्या मस्तकावर अश्रूंचे सिंचन करीत मुखाग्नी दिला. मुलींचे वडिलांवरील प्रेम पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले. (Daughters did funeral to father Nashik News)
येथील पित्रेश्वर कॉलनीतील रहिवासी तथा शिरपूर साखर कारखान्याचे माजी कर्मचारी हनुमंत श्यामराव करंदीकर-पाटील (वय ६५) यांचे अल्प आजाराने बुधवारी (ता. ८) निधन झाले. त्यांना दोन मुली आहेत. मुलगा नसल्याची कोणतीही खंत न बाळगता हनुमंत पाटील यांनी मुलगी भाग्यश्री व वर्षा यांना उच्चशिक्षित केले. अभियंता झालेल्या दोन्ही मुली उच्चपदावर नोकरीला आहेत. भाग्यश्री पाटील या कॅनडा येथे कार्यरत आहेत.
फक्त एक दिवस थांबा!
हनुमंत पाटील यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. नातलगांना निरोप गेले. कॅनडा येथील भाग्यश्रीच्या शोकाला पारावार उरला नाही. कॅनडा-भारत अंतर, हवामान, ऐनवेळी प्रवासाची तयारी यामुळे तिला अंत्यसंस्कारासाठी येता येईल की नाही, याबाबत शंका होती. मात्र तिने निर्धारपूर्वक मी पोचणारच, फक्त एक दिवस थांबा, असे सांगितले. त्यामुळे अंत्यसंस्कार एक दिवस स्थगित करण्यात आले. प्रचंड धावपळ करून एकेक बाब जुळवत भाग्यश्री कॅनडातून शिरपूरला पोचली. वडिलांचा मृतदेह पाहून तिच्या संयमाचा बांध फुटला. रोखून धरलेल्या अश्रूंना तिने वाट मोकळी करून दिली.
हेही वाचा: मनमाड नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर; राजकीय घडामोडींना येणार वेग
पित्याला दिला मुखाग्नी
मुलींचे वडिलांवरील प्रेम पाहता रुढीला फाटा देऊन त्यांनीच वडिलांना मुखाग्नी द्यावा, असा निर्णय काका दिगंबर पाटील, युवराज पाटील, विजय पाटील, नातलग तथा माजी नगरसेवक राजेंद्र पाटील यांनी घेतला. शुक्रवारी (ता. १०) सकाळी येथील अमरधाममध्ये भाग्यश्री व वर्षा यांनी पित्याच्या चितेला मुखाग्नी दिला. बापलेकींच्या नात्याचा हा उत्कट व दृढ आविष्कार पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. या कुटुंबाचा पुरोगामी निर्णय व त्याला पाठिंबा देणाऱ्या नातलगांचे कौतुकही करण्यात आले.
हेही वाचा: Nashik : महापालिकेचा खासदार पुत्रास दणका; ठोठावला 4 लाखाचा दंड
Web Title: Daughters Did Funeral To Father Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..